मुंबई, दि. 11 : मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घेण्याची आकांक्षा जगभरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते. ‘मुंबई दर्शन’ या वातानुकुलित बसमुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनातील मुंबईच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन (बेस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या ‘मुंबई दर्शन सहल’ या वातानुकुलित बसचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई दर्शन वातानुकुलित बसचे दर कमी असल्याने सामान्य जनतेला पर्यटन परवडणार आहे. या नियोजनामुळे हा उपक्रम अत्यंत चांगल्याप्रकारे चालेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करुन त्यांनी पर्यटन मंत्री व राज्यमंत्री यांचे अभिनंदन केले. पर्यटनामुळे विकास दरात वाढ होते तसेच पर्यटन हे राजदूताचे महत्त्वाचे कार्य करते. पर्यटनामुळे कौशल्य विकासातही भर पडते. या बसमुळे मुंबईतील सर्व महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती जगभरात जाईल. पर्यटनातील गाईड हा महत्त्वाची भूमिका करत असतो. कारण त्यांच्यामुळेच सर्व देश-विदेशी पर्यटकांना सर्व प्रेक्षणीय स्थळांची महत्वपूर्ण माहिती दिली जाते.
रावल म्हणाले की, मुंबई दर्शन वातानुकुलित बस ही मुख्यमंत्र्यांच्या ‘व्हिजीट महाराष्ट्र-2017’ ची नांदी असून पर्यटनातील हे पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. आजचा हा क्षण सुवर्ण क्षण आहे. जगासमोर मुंबईची ओळख दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री यांच्या नेतृत्त्वाखाली पर्यटनात महाराष्ट्र अग्रस्थानी येण्यासाठी ‘मुंबई दर्शन बेस्ट वे’चे पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. राज्यातील नागपूर, औरंगाबाद, पुणे येथेही दर्शन बस सुरु करण्याचा मानस आहे.
‘अतिथी देवो भव’ या विश्वासाला सार्थ ठरेल अशी मुंबई दर्शन वातानुकुलित बसची दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही जागरुक राहू, असे आश्वासन डॉ.जगदीश पाटील यांनी दिले. पर्यटकांसाठी ‘मुंबई दर्शन’ वातानुकुलित बसने प्रवास करणे हा सगळ्यात चांगला मार्ग आहे, असे पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी सांगितले. या सहलीमुळे मुंबईचे पर्यटकीय आकर्षणात भरच पडली आहे. एका दिवसात मुंबईतील 65 प्रेक्षणीय स्थळे, मार्गदर्शन करणारे गाईड, ऑडिओ-व्हिडीओ, अल्पोपहार हे सर्व माफक दरात वातानुकुलित बसमध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत, असे पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सोनी यांनी सांगितले.
यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, पर्यटन राज्य मंत्री मदन येरावार, आमदार राज पुरोहित, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव सुमित मलिक, महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, उपमहापौर अलका केरकर, अभिनेत्री जुही चावला, शायना एनसी, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, बेस्ट समितीचे अध्यक्ष मोहन मिठबावकर, बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ.जगदीश पाटील, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, तसेच अर्जेटिना, श्रीलंका, बांगलादेश, इथिओपिया, मॉरिशस या देशांचे राजदूत, इतर वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांसह, मंत्री, राज्यमंत्री, आमदार, मुख्य सचिव, अधिकारी, उद्योजक, स्वातंत्र सैनिक, पत्रकार तसेच विद्यार्थी यांनी आज पहिल्या दिवशी ‘ वातानुकुलित मुंबई दर्शन बस’मधून काही प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी सोनटक्के तसेच ‘मुंबई मेरी जान’ या नृत्याचे स्वरश्री कलामंच यांनी सादरीकरण केले.
बिघाडग्रस्त एसी बसमधून मुंबई दर्शन
मुंबई : प्रतिनिधी - देशी परदेशी पर्यटकांसह मुंबईकरांना शहर आणि उपनगरातील पर्यटनस्थळांचे दर्शन घडवून आणण्यासाठी बेस्ट आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मुंबई दर्शन सहल सेवेचा गुरुवारी शुभारंभ केला. यासाठी वारंवार बिघाड होत असलेल्या बेस्टच्या वातानुकूलित बसेस मुंबई दर्शन सेवेसाठी वापरण्यात येणार आहेत. या बसमधील बिघाडाची मालिका सुरूच राहिल्यास मुंबई दर्शनामध्ये विघ्न येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दोन महिने केवळ शनिवार आणि रविवारी पर्यटकांना मुंबई दर्शनाची सोय करून देण्यात येणार असून ऑक्टोबरपासून दररोज पर्यटकांना मुंबई दर्शन करता येणार आहे.
No comments:
Post a Comment