रस्त्यांच्या कामाबाबत ५४ कोटींचा प्रस्ताव चर्चेविना मंजूर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2016

रस्त्यांच्या कामाबाबत ५४ कोटींचा प्रस्ताव चर्चेविना मंजूर

मुंबई, दि. 24 Aug 2016 - निवडणुकीपूर्वी वॉर्डातील रस्तेच चकाचक करण्यास नगरसेवकांनी सुरुवात केली आहे़ अशा ४५ रस्त्यांचा ५४ कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर आज आला होता़. नुकताच रस्त्यांचा ३५२ कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाला असल्याने यावर शंकाकुशंका सदस्यांनी उपस्थित करणे अपेक्षित होते़. परंतु सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकही चिडीचूप राहिल्याने चर्चेविनाच हा प्रस्ताव झटपट मंजूर करण्यात आला़.

रस्त्यांची झीज होणे, भेगा पडणे, विविध युटिलिटिज कंपनीमार्फत चर खणणे अशा कारणांमुळे पश्चिम उपनगरातील रस्ते खराब झाले आहेत़ या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ५४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत़ अंधेरी पूर्वेला नऊ रस्ते, अंधेरी पश्चिम एक आणि कांदिवली पश्चिम २३ रस्त्यांचे काम पावसाळ्यानंतर सुरु होणार आहेत़ याचे काम मे़ देवा इंजिनिअर्सला तर खार, वांद्रे आणि अंधेरी पूर्व येथील काही रस्त्यांचे काम मेसर्स कोनार्क स्ट्रक्चरल इंजिनिअर्सला देण्यात आले आहे़. 

कंत्राटाच्या एकूण किंमतीपेक्षा ५० ते ६० टक्के कमी बोली ठेकेदार लावत होते़ ज्यामुळे खर्च १०० रुपये असेल तर ६० रुपये ठेकेदार खर्च करीत असल्याने कामाच्या दर्जेबाबतही साशंकता निर्माण होत होती़ कामं निकृष्ट दर्जाची केली जात असल्याचेही समोर आले आहे़ मात्र या कामासाठी मे़ देवा इंजिनिअर्सने १५ टक्के कमी बोली लावली आहे़ तर अन्य रस्त्यांच्या कामासाठी मे़ कोनार्क स्ट्रक्चल इंजिनिअर्सने १३़६८ टक्के कमी बोली लावली आहे़. 

पश्चिम उपनगरातील ४५ रस्त्यांच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीमध्ये आज मंजूर झाला़ विशेष म्हणजे रस्त्यांचा ३५२ कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर पहिल्यांदाच रस्त्यांची कामं हाती घेण्यात आली आहेत़ तरीही या प्रस्तावर सर्वच सदस्य चिडीचूप राहिल्याने अखेर या कामाला स्थायी समितीने हिरवा कंदिल दाखविला़

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS