मुंबई दि 19 : छत्रपती शिवाजी महाराज, फुले - शाहू- आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये रोवली. त्याचे फलित आज आपल्याला टीना डाबी या तरुणीच्या माध्यमातून पहावयास मिळत आहे. ही गोष्ट अभिमानास्पद आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून तरुणांनी सनदी सेवेत करिअर करावे, असे आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे बडोले यांच्या हस्ते केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भारतीय प्रशासन सेवा परीक्षेमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या टीना डाबी हिचा सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र, तथागत गौतम बुद्धांचे पद चिन्ह, डॉ. आंबेडकर यांची पुस्तके आणि पुष्पगुच्छ असे सत्काराचे स्वरूप होते. या सत्कार सोहळ्यास बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे, दिल्लीतील पोलीस अधिकारी संदीप तामगाडगे, सनदी अधिकारी सुनिल वारे, सीमा शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त सतीश ढवळे,विभागीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोटसुर्वे आदींसह टीना दाबी यांच्या मातोश्री हेमाली दाबी याही उपस्थित होत्या.
बडोले म्हणाले की, समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते, हे डॉ. आंबेडकरांचे विचार सार्थ ठरत आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. राजकीय लोकशाहीचे सामाजिक लोकशाहीत परिवर्तन होणे गरजेचे आहे.
डाबी म्हणाल्या की, डॉ. आंबेडकर यांना आदर्श मानल्यामुळेच मी घडू शकलो. आज डॉ. आंबेडकरांची कर्मभूमी असलेल्या अतुलनीय महाराष्ट्रात माझा सत्कार होत असल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. डॉ आंबेडकरांच्या 125 व्या जयंती वर्षात मला हे यश प्राप्त झाले, ही माझ्यासाठी एक गर्वाची बाब आहे. समाजात चुकीच्या गोष्टी बदलण्याची तुमची मानसिक तयारी असेल तर स्पर्धा परीक्षेतील यशापासून तुम्ही दूर राहू शकत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

No comments:
Post a Comment