एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन दलाची संपूर्ण अद्ययावत यंत्रणा अवलंबविणे आवश्यक - सुभाष देसाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रात अग्निशमन दलाची संपूर्ण अद्ययावत यंत्रणा अवलंबविणे आवश्यक - सुभाष देसाई

Share This
मुंबई, दि. 27 : आग लागून होणारी दुर्घटना टाळण्यासाठी सर्वच आस्थापनांनी अग्निप्रतिबंधक सुरक्षा उपाय योजना अवलंबविणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात संपूर्ण अद्ययावत साहित्यासह नवीन तंत्रज्ञान युक्त अग्निशामन यंत्रणा उभारून संपूर्ण सुरक्षेची खबरदारी घेतली आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.
फायर अँड सेफ्टी असोसिएशन ऑफ इंडियावतीने गोरेगाव येथे आयोजित इंडिया फायर अँड सेफ्टी यात्रा 2016 चे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष के. पी. डॉमनिक, मुंबई विभागाचे अध्यक्ष मनोज शेणॉय, राष्ट्रीय अध्यक्ष पंकज धारकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन दलाचे सल्लागार एस.एस. वारिक, राष्ट्रीय अग्निशमन अधिकारी महासंघाचे अध्यक्ष एम. व्ही. देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

देसाई म्हणाले की, कोणत्याही आपत्तीत अग्निशमन दलाच्या जवानांचे कार्य अतिशय मौल्यवान असते. मुंबईवरील दहशतवादी हल्ला, डोंबिवलीतील आगीची दुर्घटना आदी घटनांमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेले धैर्य अतुलनीय असून त्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे. कोणत्याही सभा, समारंभात तसेच मोठमोठ्या आस्थापनांमध्ये सुरक्षा उपाय योजना करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने आपत्ती निवारणाला प्राधान्य दिले असून राज्यातील अग्निशमन यंत्रणा मजबूत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. औद्योगिक महामंडळात अत्याधुनिक साहित्यासह सज्ज असलेले 30 फायर स्टेशन उभारण्यात आली असून 5 फायर स्टेशनची कामे प्रगतीपथावर आहेत. महामंडळाच्या प्रत्येक औद्योगिक वसाहतींमध्ये सुरक्षेची संपूर्ण काळजी घेण्यात येते, असे ही देसाई यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages