मुंबई दि. 3 : मुंबई महापालिकेतील ग्रीस खरेदी गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. मुंबई महापालिकेच्या उदंचन केंद्रामध्ये गैरव्यवहार झाल्याबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य गिरीशचंद्र व्यास, नारायण राणे, भाई जगताप, विद्या चव्हाण, किरण पावसकर, सुनील तटकरे, राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य लेखा परिक्षक यांनी 2004 रोजी सादर केलेल्या अहवालातून ग्रीस खरेदी गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी चौकशी केली असून या खात्यांतर्गत असलेल्या 27 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्या वेतनातून ही रक्कम वसूल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तसेच संबंधित कंपनीची चौकशी करुन कारवाई करण्यात येईल. गैरव्यवहार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment