गोपले यांच्या निधनाची माध्यमांनी दखल न घेतल्याने संतप्त मातंग समाजाचा चक्काजाम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गोपले यांच्या निधनाची माध्यमांनी दखल न घेतल्याने संतप्त मातंग समाजाचा चक्काजाम

Share This
मुंबई 22 Aug 2016 : अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि अखिल भारतीय मातंग संघाचे अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मातंग समाजासाठी आयुष्यभर लढणाऱ्या या नेत्याच्या निधनाची बहुतांश माध्यमांनी दखलच न घेतल्यामुळे संतप्त झालेल्या मातंग समाजाच्या कार्यर्त्यांनी सोमवारी मुंबईकडे येणारी आणि मुंबईबाहेर जाणारी वाहतूक चार तास अडवली.
मातंग समाजासाठी स्वत:ला वाहून घेणारे बाबासाहेब गोपले अनेक दिवसांपासून फुप्फुसाच्या विकाराने त्रस्त होते. घाटकोपर येथील हिंदू सभा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलविले होते. मात्र रविवारी सकाळी ८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यात बाबासाहेब गोपले यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे सरकारने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन केले. तसेच मातंग समाजाच्या हितासाठी त्यांनी अनेक आंदोलने देखील केली आहेत.

गोपले यांची अंत्ययात्रा मानखुर्दच्या साठेनगर येथील त्यांच्या राहत्या घरातून सोमवारी सकाळी ११ वाजता शिवाजी पार्कच्या दिशेने निघाली. दुपारी १ वाजता त्यांची अंत्ययात्रा चेंबूरच्या अण्णाभाऊ साठे उद्यानाजवळ पोहोचली. सुमननगर जंक्शनवर चक्काजाम केला. मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुमननगर जंक्शन येथे अंत्ययात्रा थांबवून रास्ता रोको केला तर बेस्टच्या दोन बसेसची ताडफोडही केली. 
त्याचा फटका ठाणे आणि पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला बसला.

मातंग समाजाच्या एवढ्या मोठ्या नेत्याचे निधन झाले असताना प्रसारमाध्यमांनी योग्य दखल घेतली नाही व एकाही वृत्तवाहिनीने बातमी दाखवली नाही. त्यामुळे संतापलेल्या मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुमननगरच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान येथे  येताच अंत्ययात्रा थांबवून रास्ता रोको केला. प्रसार माध्यमांच्या विरोधात फलकबाजी करून तीव्र निदर्शने करण्यात आली. पोलिसांनी संतापलेल्या कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. प्रसारमाध्यमांना या ठिकाणी घेऊन या तरच आम्ही अंत्ययात्रा पुढे नेऊ असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्ग व सायन पनवेल - मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. 

सुमारे चार तास अंत्ययात्रा थांबवून रास्तारोको करण्यात आला. प्रसारमाध्यमांचा एकही प्रतिनिधी त्यांना न दिसल्याने त्यांनी आपला राग बेस्टच्या बसेसवर काढला. दोन बसेसची तोडफोड केली तर एक खाजगी कारची काचही तोडण्यात आली.  जमाव हिंसक झाल्याचे पाहून अखेर मातंग समाजाच्या नेत्यांनी कोणतेही हिंसक कृत्य न करण्याचे आवाहन केले. अखेर तीन तासानंतर बाबासाहेब गोपले यांची अंत्ययात्रा शिवाजीपार्कच्या दिशेने रवाना झाली. 

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
बाबासाहेब गोपले यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी ७ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी केंद्रीय सामाजिक मंत्री रामदास आठवले, समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, डॉ. प्रीतिश कुमार-जळगांवकर, राष्ट्रवादी सचिव प्रकाश भोसले, आरपीआयचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, डॉ. विजय मोरे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पवार उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages