शेवटच्या श्वासापर्यंत महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा सुरू राहील - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शेवटच्या श्वासापर्यंत महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा सुरू राहील

Share This
भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचा संकल्प
नागपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र होय या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. ते बौद्धांच्याच ताब्यात असावे, यासाठी लढा देत असलेले भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत महाबोधी महाविहार मुक्तीचा लढा हा सुरू राहील, तो आपला प्रण आहे असा पुनरुच्चार रविवारी केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे ३० आॅगस्ट रोजी ८२ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्त इंदोरा येथील बुद्ध विहारात अनेकांनी त्यांची भेट घेतली. यावेळी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भदंत ससाई यांनी या लढ्याची पार्श्वभूमी सांगितली. ई.स.पूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. शांतीचे अग्रदूत गौतम बुद्ध यांना ज्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. बौद्ध अनुयायी भिक्खू आणि जगभरातील पर्यटक तसेच शांतीचा मंत्र जपणारे बांधव येथे येतात. मात्र, या महाविहाराचे नियंत्रण व व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही. यासाठी आपण १९९२ पासून आंदोलन सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.

१९४९ चा कायदा रद्द करून विहाराचे व्यवस्थापन आणि नियंत्रण बौद्धांना सोपविण्यात यावे, याकरिता १९९३ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. दरम्यान केंद सरकारतर्फे वाटाघाटी सुरू होत्या. सरकारच्या विनंतीवरून ही याचिका मागे घेतली. दरम्यान केंद्र सरकार आणि बिहार राज्य सरकारने कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून पुन्हा याचिका दाखल केली. १९९२ पासून आतापर्यंत १८ टप्प्यात हे आंदोलन सुरू आहे. सर्वच पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केला. परंतु आजही महबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात नाही. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत बोधगया मुक्तीचा लढा असाच सुरू ठेवण्याचा निर्धार भदंत ससाई यांनी यावेळी केला. शांती आणि करुणेच्या मार्गानेच हा लढा सुरू राहील. बाबासाहेबांनी दिलेले संविधान या लढ्याला कायद्याचे बळ देईल, असेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages