1 ऑक्टोबर पासून स्तन कर्करोग जागृती अभियान - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

1 ऑक्टोबर पासून स्तन कर्करोग जागृती अभियान

Share This
मुंबई, दि. 29 : राज्यातील महिलांच्या आरोग्याच्या समस्या वाढत असून, स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने वैद्यकीय शिक्षण विभाग राज्यभर स्तन कर्करोग जागृती महिना राबविणार आहे. 1 ऑक्टोबर पासून या जनजागृती अभियानाची सुरवात राज्यभर होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

महाजन म्हणाले की, 2012 च्या सर्व्हेनुसार देशात 1 लाख 45 हजार रूग्ण आढळून आले. त्यापैकी 70 हजार रूग्ण दगावल्याची नोंद आहे. जागतिक पातळीवर विचार केला असता मध्यम व अल्प उत्पन्न असलेल्या देशामध्ये 52 टक्के महिलांमध्ये स्तन कर्करोगाची लक्षणे आढळून आली असून, भविष्यात हे प्रमाण 70 टक्क्यावर जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या परिस्थितीचा अभ्यास करून, वैद्यकीय शिक्षण विभागाने महिलांमध्ये जनजागृती, कर्करोग तपासणी, प्रशिक्षण व उपचार शिबीर प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय तसेच रूग्णालयात आयोजित करण्याचे ठरविले आहे.

ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा तत्परतेने मिळत नसल्याने अनेक महिलांचे आजाराकडे दुर्लक्ष होऊन आपले प्राण गमवावे लागतात. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग आणि इम्पॅथी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांची प्राथमिक तपासणी अद्ययावत अशा रेडीयेशन फ्री यंत्राद्वारे मोफत करण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान कर्करोगग्रस्त रूग्ण आढळून आल्यास पुढील सर्व उपचार हे मोफत केले जाणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले.

या मोफत तपासणी शिबीराचा गरजू आणि सर्वसामान्य महिलांना लाभ मिळावा आणि भविष्यात महाराष्ट्र राज्य महिला स्तन कर्करोग मुक्त करण्याच्या दिशेने या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाजन यांनी आज केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages