रिक्षा संपाला मुंबईत संमिश्र प्रतिसाद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रिक्षा संपाला मुंबईत संमिश्र प्रतिसाद

Share This
मुंबई : ओला, उबर यासह अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांवर निर्बंध आणावे, अवैध वाहतुकीवर बंदी आणावी, यासह अन्य मागण्यांसाठी मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनकडून बुधवारी एक दिवसाचा रिक्षा संप पुकारण्यात आला होता. या संपात काही प्रमाणात रिक्षाचालक सामील झाल्याने मुंबईकर नागरिक, वयोवृद्ध, विद्यार्थी यांचे हाल झाले. पूर्व व पश्चिम उपनगरातील अनेक ठिकाणी रिक्षा बंद असल्याने मुंबईकरांना पायपीट करावी लागली. 


आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनकडून एकदिवसीय संपाची हाक देण्यात आली होती. रिक्षा बंद ठेवण्याचा निर्धारच युनियनकडून करण्यात आला होता, मुंबई उपनगरात काही रिक्षा बंद ठेवण्यात आल्या तर काही रिक्षा नेहमी प्रमाणे रस्त्यावर धावत होत्या. काही शेअर रिक्षा आणि स्वाभिमानसह अन्य रिक्षा संघटना संपात सहभागी न झाल्याने संपावर थोडा-फार परिणाम झाला. सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना रेल्वे स्थानक, कार्यालयांपर्यंत, तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जाण्यासाठी पायपीट करावी लागली. मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या  या बंद मुळे वृद्ध आणि विद्यार्थ्यांचे हाल झाले. रिक्षाचालकांनी पुकारलेल्या संपात प्रवाशांचे हाल होऊ नयेत, म्हणून बेस्टने १२३ जादा बसगाड्या चालवल्या होत्या. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील विविध आगारांतून सोडण्यात आलेल्या या जादा बसगाड्यांनी रिक्षा संपात प्रवाशांना दिलासा देण्याचे काम केले.

मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले की, मागण्यांसंदर्भात परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यासोबत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत अवैध वाहतुकीला आळा बसवण्यासाठी पथक नेमण्याची मागणी केली. त्याला तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे, ओला, उबरवर निर्बंध आणण्यासाठी केंद्र सरकारच्या एका समितीसमोर हा मुद्दा मांडण्यात येणार असल्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले, तसेच परिवहनमंत्र्यांसोबतही बैठक होणार आहे. ओला, उबर यासह खासगी कंपन्यांवर निर्बंध आणावेत, या मुख्य मागणीसाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते आणि मुंबई आॅटोरिक्षा व टॅक्सीमेन्स युनियन, जय भगवान महासंघ, तसेच स्वाभिमान टॅक्सी युनियन यांच्यात १ सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages