खेळाडूंना उत्तम सोयी-सुविधेसाठी राज्य शासन प्रयत्नशील - विनोद तावडे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खेळाडूंना उत्तम सोयी-सुविधेसाठी राज्य शासन प्रयत्नशील - विनोद तावडे

Share This
मुंबई, दि. 2 : 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत राज्यातून जास्तीत जास्त खेळाडू सहभागी व्हावेत यासाठी खेळाडूंना सोयी-सुविधा आणि अधिक अर्थसाह्य देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.
रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या महाराष्ट्रातील क्रीडापटूंच्या सत्काराप्रसंगी तावडे बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, सहसंचालक नरेंद्र सोपल, उपसंचालक एन.बी. मोटे, चंद्रकांत कांबळे, मुंबई जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के आदी उपस्थित होते.

रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेल्या ललिता बाबर व कविता राऊत (ॲथलीट), प्रार्थना ठोंबरे (टेनिस), दत्तू भोकनळ (रोईंग) आणि आयोनिका असिम पॉल (शुटींग) यांचा सत्कार तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तावडे यांनी क्रीडापटू, प्रशिक्षक आणि पालक यांच्याशी चर्चा करुन त्यांच्या शासनाकडून अपेक्षा जाणून घेतल्या. या संवादाबद्दल खेळाडूंनी क्रीडा मंत्री तावडे यांचे आभार मानले.

‘आधी अभ्यास, मग खेळ’ ही समाजातील मानस‍किता बदलणे आवश्यक आहे. अभ्यासासोबतच मुलांना विविध खेळांत सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे. शालेय शिक्षणात विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. राज्यातील क्रीडापटूंनी पुढील चार वर्षांचा परिपूर्ण आराखडा शासनाला सादर करावा जेणेकरुन खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण व सोयी-सुविधा उपलब्ध करता येतील, असेही तावडे यांनी यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages