मुंबई - हास्य कलाकार कपिल शर्माने पालिका अधिका-यांनी लाच मागितली, असा आरोप केला, पण तो अधिका-यांचे नाव उघड का करत नाही’, असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी ‘लाचप्रकरणी गप्प बसणाऱ्या शर्मा यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई करायलाच हवी’ अशी मागणी केली. या मागणीनंतर पोलिसांनी कपिल शर्माविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवून घेतला आहे.
अंधेरी पश्चिम येथील बंगल्याच्या परिसरात बेकायदा बांधकाम करणारा व त्यासाठी तिवरांच्या झाडांची कत्तल करणारा अभिनेता कपिल शर्मा यांच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हायलाच पाहिजे. त्यासाठी सर्वात आधी त्याच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवून घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी आज केली. वर्सोवा पोलीस ठाण्यात शालिनी ठाकरे आणि मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण काळे यांची भेट घेऊन कपिल शर्माने केलेल्या बेकायदेशीर बांधकामांची माहिती दिली.
शालिनी ठाकरे यांनी अंधेरी पश्चिम येथील तहसिलदारांची भेट घेऊन शर्मा यांच्या बंगल्याच्या परिसरातील तिवरांच्या झाडांची कत्तल तसेच अनधिकृत बांधकाम व तिवरांच्या तोडणीबाबत अनधिकृत गौणखनिज भराव अंतर्गत म.ज.म. अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) व (८) नुसार दंडात्मक व कायदेशीर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.
शालिनी ठाकरे यांच्या मागणीनंतर तहसिलदारांनी तत्काळ कपिल शर्माच्या बंगल्याचे सर्व्हेक्षण आणि पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर वन विभाग व तलाठी कार्यालयातील अधिकारी यांच्यासह शालिनी ठाकरेही बंगल्यावर पाहणी करण्यासाठी गेल्या. नियमांनुसार, खारफुटीपासून ५० फुटांपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास मनाई असतानाही कपिल शर्मा यांनी खारफुटीपासून फक्त ३ फुटांपर्यंतचे बांधकाम केल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले.
कपिल शर्माचा बंगला ज्या भागात आहे, त्या परिसरात अनेकांनी कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर बांधकामे केलेली आहे. मात्र त्यापैकी अनेकजण हे सेलिब्रिटी असल्यामुळे पोलीस व प्रशासन त्यांच्याविरोधात कारवाई करीत नाहीत. सर्वसामान्यांना एक कायदा व सेलिब्रिटिंसाठी दुसरा कायदा, असा दुटप्पीपणा महाराष्ट्रात नको. कपिल शर्माला अटक करून पोलिसांनी अशा नाठाळ सेलिब्रिटिंना वठणीवर आणावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या स्टाइलने आंदोलन करेल”, असा इशाराही शालिनी ठाकरे यांनी यावेळी दिला.
दोन वर्षांच्या कैदेची तरतूद :
खारफुटीपासून ५० फुटांपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास मनाई आहे. बेकायदा बांधकाम आणि खारफुटीवर अतिक्रमण केल्यास, अनधिकृत गौणखनिज भराव अंतर्गत अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) व (८) अनुसार दंडात्मक व कायदेशीर करवाई होऊ शकते. हा गुन्हा सिद्ध झाल्यास दोन वर्षांची कैद होऊ शकते.
