रेल्वे प्रवासात हरवलेल्या १५ लाखाच्या वस्तू प्रवाश्यांना परत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वे प्रवासात हरवलेल्या १५ लाखाच्या वस्तू प्रवाश्यांना परत

Share This
मुंबई : उपनगरीय रेल्वेने प्रवास करताना आॅगस्ट महिन्यात विसरभोळ्या प्रवाशांकडून तब्बल १५ लाख किमतीच्या वस्तू गहाळ झाल्या होत्या. त्याचा शोध घेत त्या प्रवाशांना परत करण्यात आल्या आहेत. यात लॅपटॉप आणि सोन्याचा मुद्देमाल अधिक असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.
प्रवाशांकडूनच प्रवासात स्वत:च्या बॅगा किंवा मौल्यवान वस्तू विसरल्या जातात. ही बाब लक्षात येताच ९८३३३३११११ या हेल्पलाइनवर संपर्क साधून लोहमार्ग पोलिसांची मदत घेतली जाते. आॅगस्ट महिन्यात बॅगा व मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याचे १ हजार २१ कॉल लोहमार्ग पोलिसांच्या हेल्पलाइनवर आले आहेत. यात २०८ बॅगा व मौल्यवान वस्तू शोधून देण्यात यश आले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यामध्ये ३ लाख ५६ हजार रुपये किमतीचे १२३ ग्रॅम सोने, ३ लाख ९० हजार रुपये किमतीचे १२ लॅपटॉप, २ लाख ८९ हजार १५० रुपये किमतीचे ३४ मोबाइल, २ लाख ३२ हजार ५८० रुपये रोख रक्कम आणि २ लाख ७४ हजार ९४० रुपये व अन्य वस्तूंसह जवळपास १५ लाखांचा मुद्देमाल प्रवाशांना परत केला आहे.

अपघात, अपमृत्यू आणि वैद्यकीय मदतीसाठी लोहमार्ग पोलिसांना ८५ कॉल आले. त्यापैकी वैद्यकीय मदतीसाठी २५ तर जखमींच्या मदतीसाठी ४८ कॉलचा समावेश आहे. उर्वरित १२ कॉल हे मृत्यू झाल्याची माहितीचे होते. प्रवाशांकडून हेल्पलाइनवर तक्रारीही करत मदत मागण्यात आली आहे. विकलांग डब्यात अन्य प्रवाशांनी प्रवेश केल्याचे २८, महिला डब्यातून ७६, फेरीवाल्यांबाबतचे ९ त्याचप्रमाणे बेवारस बॅग आणि संशयित बॅगांबाबत ६० व संशयित व्यक्तींबाबत २५ कॉल आल्याची माहिती देण्यात आली. रेल्वे प्रशासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत १४ कॉल आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages