दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा देण्यासाठी ११ सप्टेंबरला महामेगाब्लॉक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा देण्यासाठी ११ सप्टेंबरला महामेगाब्लॉक

Share This
मुंबई :दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कट-कनेक्शनासाठी ११ सप्टेंबरला पहिला महामेगाब्लॉक घेण्यासाठीची कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र सणासुदीच्या काळात ब्लॉक घेतल्यास प्रवाशांच्या संतापाला सामोरे जावे लागणार असल्याने मध्य रेल्वेने आता ब्लॉक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दिवा स्थानकात जलद गाड्यांना थांबविण्यासाठी किमान चार मोठे ब्लॉक घेण्याची गरज आहे, असे मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रवींद्र गोयल यांनी नुकतेच सांगितले होते. हा ब्लॉक महिन्याभरानंतर घेण्यात येणार होता. मात्र पहिला ब्लॉक सप्टेंबर महिन्यातच घेण्याचा निर्णय घेतला आणि हा ब्लॉक ११ सप्टेंबरला घेण्याबाबत रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेला सूचना केली. याबाबत मध्य रेल्वे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाला पत्रे पाठविण्यात आली होती. एमआरव्हीसीने सर्व साधनसामग्री जमा केल्यास ११ सप्टेंबरला ब्लॉकचे नियोजन शक्य आहे. तर दुसरीकडे ऐन गणेशोत्सवात बोर्डाने ब्लॉकच्या हालचाली सुरू केल्याने संबंधितांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल. परिणामी, तूर्तास तरी ब्लॉकबाबत अंतिम निर्णय झाला नसून, मध्य रेल्वेची भूमिका पाहता हा ब्लॉक पुढे जाण्याची चिन्हे आहेत. 

दरम्यान, दिवा स्थानकात मरे आणि एमआरव्हीसी एकत्रित ब्लॉक घेणार आहेत. ब्लॉकवेळी अप जलद गाड्यांसाठी नवीन फलाट तयार करणे आवश्यक आहे. फलाटावर डाऊन जलद व धिम्या गाड्या थांबविल्या जाणार आहेत. ही कामे एमआरव्हीसी करणार आहे. कामांच्या पूर्ततेबाबत एमआरव्हीसीने पत्रव्यवहार केल्यानंतरच मध्य रेल्वेच्या वतीने ब्लॉक घेण्यात येईल. सीएसटी येथे हार्बरच्या १२ डबा गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म आणि रुळांचे काम १९ ते २१ फेब्रुवारी या काळात करण्यात आले होते. त्यासाठी जवळपास ७२ तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. हा सर्वांत मोठा ब्लॉक होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages