Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबईच्या भूगर्भात तब्बल ६६ पाण्याच्या टाक्यांचा शोध

मुंबई : बोरीवली येथील कान्हेरी गुंफा येथे नव्या गुंफेचा नुकताच शोध लागला. त्यानंतर, राजभवन येथील बंकरने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले. आता मुंबईच्या भूगर्भात तब्बल ६६ पाण्याच्या टाक्यांचा शोध लागला आहे. यातील प्रत्येक टाकीची क्षमता जवळपास अडीच लाख लीटरची आहे. वाढत्या शहरीकरणामुळे या टाक्यांची दुरवस्था झाली असून पालिका प्रशासनाने या टाक्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

काही दिवसांपूर्वी कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या आवारात पाण्याची टाकी असल्याचा उलगडा झाला. शिवसेनेचे नामनिर्देशित नगरसेवक आणि सेंट झेवियर्स महाविद्यालयाचे प्राध्यापक अवकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या संग्रहालयाच्या आवारात १० मीटर बाय १० मीटर लांबी, रुंदीची आणि तीन मीटर खोलीची भूमिगत पाण्याची टाकी निदर्शनास आली. त्यानंतर, या मोहिमेचा विस्तार करीत मुंबईतील आणखी काही ठिकाणी याचा शोध सुरू झाला. या शोधमोहिमेत मुंबईच्या केवळ ‘ए’ वॉर्ड मध्ये सहा पाण्याच्या टाक्या सापडल्या, तर ‘ए’ ते ‘जी’ वॉर्ड्समध्ये एकूण ६६ टाक्या सापडल्या आहेत, असे अवकाश जाधव यांनी सांगितले. मात्र, यातील १३ पाण्याच्या टाक्यांचा शोध घेणे कठीण जात असल्याची माहिती जाधव यांनी दिली.

कुलाबा येथील ‘मेट्रो हाउस’ला लागलेल्या आगीदरम्यान अग्निशमन दलाला येथे पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला. अशा वेळी संग्रहालयातील पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून ही आग विझवणे अधिक सोपे झाले असते. ब्रिटिशांना या दूरदृष्टीच्या जाणिवेतून पाण्याच्या टाक्यांची उभारणी केल्याचे जाधव यांनी सांगितले. मात्र, आताचे पालिका प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाप्रमाणे जे.जे. स्कूल आॅफ आर्ट, सेंट जॉर्ज रुग्णालय, पोलीस मुख्यालय, जे.जे.रुग्णालय, शिवडी टीबी रुग्णालय, नायगाव पोलीस वसाहत, डॉकयार्ड दिलिमा स्ट्रीट, वाडीबंदर पोलीस लाइन, राजभवन आवार, खेतवाडी पालिका उद्यान अशा विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या सापडल्या आहेत.

१ कोटी ७५ लाख लीटर जलसाठ्याची क्षमता 
मुंबईच्या भूगर्भातील प्रत्येक टाकीची क्षमता अडीच लाख याप्रमाणे या पाण्याच्या टाक्यांद्वारे तब्बल १ कोटी ७५ लाख लीटर जलसाठ्याची क्षमता आहे. त्यामुळे याचा विचार करून पाण्याच्या टाक्यांसदर्भात काही मागण्यांचे निवेदन जाधव महानगरपालिका आयुक्त अजय मेहता यांना देणार आहेत. पालिका आयुक्तांना देण्यात येणाऱ्या मागण्यांच्या निवेदनात मुख्यत्वे, या सर्व पाण्याच्या टाक्यांचे जतन, संवर्धन आणि त्या पुनरुज्जीवित करण्यात याव्यात. या पाण्याच्या टाक्या ब्रिटिशकालीन असल्याने त्यांना हेरिटेजचा दर्जा देण्यात यावा, जेणेकरून त्यांची हेळसांड होणार नाही. मुख्य म्हणजे, अग्निशमन दलाला या पाण्याच्या टाक्यांची माहिती करून देण्यात यावी. पालिकेच्या प्रत्येक विभागनिहाय कक्षाकडे त्यांची जबाबदारी देण्यात यावी. या पाण्याच्या टाक्यांच्या स्थळी महापालिकेने सूचनांचे फलक लावावे. या पाण्याच्या टाक्यांचा बारमाही वापर करता येणे शक्य नसेल, तर त्या टाकीच्या हद्दीतील संस्था वा वसाहतीला तिचा वापर करण्याची परवानगी द्यावी, या मागण्यांचा समावेश आहे. नवीन विकास आराखड्यात या पाण्यांच्या टाक्यांच्या अस्तित्वाला असणारा धोका लक्षात घेऊन त्यांना वगळण्यात यावे, तसेच या विकास आराखड्यात ‘निळ्या’ रंगांनी त्या दर्शविण्यात याव्यात, अशी मागणीही जाधव यांनी केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Voter Information & Services

Ads Bottom