मुंबई – महापालिका लवकरच १४ मंडईंचे पुनर्विकास करणार असून या विकासासाठी ४ एफएसआय मिळाला आहे. या निर्णयामुळे मुंबईकरांना लवकरच उत्तुंग आणि चकाचक मंडई मिळणार आहेत. महापालिका प्रशासन महात्मा फुले मंडईचा स्वतःच विकास करणार असून या निर्णयावर सुधार समितीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
सुधार समितीत महात्मा फुले मार्केटच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव आला होता. त्यानूसार नगरसेवकांनी आपआपल्या विभागातील मंडईंच्या पुनर्विकासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले असता महापालिका प्रशासनाने ही माहिती दिली. महापालिकेने १८ मंडईंच्या विकासासाठी स्वारस्याचे पत्र (एलओआय) दिले आहे. त्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मंडई आणि कलिना मंडईच्या पुनर्विकासाचे काम सुरु करण्यात आले आहे. त्याशिवाय १२ मंडईंना पुनर्विकासासाठी कालबद्ध कार्यक्रम दिला आहे. या मंडईंना सीसीही देण्यात आला आहे. त्याशिवाय नियम ३३/२१ अनुसार १४ मंडईंचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.
