स्वतंत्र विदर्भ पत्रकार परिषदेत मनसेचा गोंधळ - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

स्वतंत्र विदर्भ पत्रकार परिषदेत मनसेचा गोंधळ

Share This
मुंबई - 'स्वतंत्र विदर्भ राज्य - काळाची गरज' या विषयावरील पत्रकार परिषद मनसेने उधळली. मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांच्या नेतृत्त्वात कार्यकर्त्यांनी अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देत, पत्रकार परिषदेत गोंधळ घातला.

विदर्भवादी नेत्यांनी आज मुंबई प्रेस क्लब येथे ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. मात्र त्याठिकाणी अखंड महाराष्ट्राची घोषणाबाजी करत मनसेने गोंधळ घातला. त्यामुळे विदर्भवादी नेत्यांना पत्रकार परिषद बंद करण्याची वेळ आली. हा महाराष्ट्र अखंड राहावा ही सर्व मराठी जनतेची इच्छा आहे, त्यामुळे महाराष्ट्र तोडू पाहणाऱ्यांची पत्रकार परिषद उधळणे यात काहीही गैर नाही, अशी प्रतिक्रिया मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी दिली. राज ठाकरे यांचा जयजयकार करत या कार्यकर्त्यांनी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप, अॅड.नंदा पराते, रमेशकुमार गजबे, डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांना घेराव घातला. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर तुम्हाला इथे पत्रकार परिषद् घेता येणार नाही. फुटीरतावाद्यांनो चालते व्हा, असे दरडावत मनसैनिकांनी पत्रकार परिषदेत टेबल खुर्च्या विखुरल्या. या गोंधळात विदर्भवादी नेते शांत होते. त्यांनी इशाऱ्याला न जुमानल्यामुळे संतापलेल्या मनसे नेते अमेय खोपकर, मुंबई महापालिकेतील मनसे गटनेते संदीप देशपांडे, नगरसेवक संतोष धुरी आणि शाखाध्यक्ष शशांक नागवेकर यांनी जोरदार घोषणाबाजी करत सुमारे दहा मिनिटे गोंधळ सुरुच ठेवला. हा अखंड महाराष्ट्र आहे. येथे तुमची भूमिका मांडु नका. परिणाम वाईट होतील. आम्ही तुमच्या वयाचा मान ठेवत आहोत. अखंड महाराष्ट्रासाठी १०६ हुतात्मे झाले आहेत. आम्ही महाराष्ट्राचा लचका तोडु देणार नाही, असा इशारा देत मनसे नेत्यांनी परिषद बंद पाडण्याचा प्रयत्न केला. हा गोंधळ सुरु असतानाच विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी मनसे कार्यकर्त्यांना सवाल करत विदर्भात सतत नक्षलवादी हल्ले करत आहेत. आतापर्यंत ९१४ जणांचा बळी गेला आहे. तेव्हा तुम्ही कुठे होता, असा सवाल केला. मात्र त्या चे उत्तर मनसैनिकांनी  दिले नाही .

त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दूर केल्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद सुरु करण्यात आली. अकरा जिल्ह्यातील वातावरण स्वतंत्र विदर्भासाठी अनुकुल असल्याचा दावा यावेळी ​ चटप यांनी केला
​​ते म्हणाले की​ , आंध्रप्रदेशमधील जनतेचा स्वतंत्र तेलंगणला विरोध होता. केंद्र सरकारने हा विरोध डावलुन तेलंगण स्वतंत्र केले. आता दोन्ही राज्यात प्रशासकीय सुविधांचा अभाव आहे. सध्या दोन्ही राज्यांची राजधानी एकाच ठिकाणी आहे.  अशी स्थिती विदर्भाची नाही​ . येथे राजधानीसाठी सुविधा आहेत. मुंबईपेक्षा विदर्भास देशाची राजधानी दिल्ली आणि इतर राज्ये जवळ आहेत. केंद्र सरकारने स्वतंत्र विदर्भाला मंजुरी दिल्यास एका मिनिटात नागपुरमध्ये झेंडावंदन करु, असा टोला चटप यांनी ​ मनसेला लगावला.

​​ऑक्टोबर भाजपने लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक प्रचारात ​ सत्तेवर येण्यापुर्वी स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन दिले होते. पण सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या आश्वासनाचा विसर पडला आहे. भाजपने विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला आहे. आता करो व मारो आम्ही मागे हटणार नाही. ​३ आणि ४ रोजी नागपुरात स्वतंत्र विदर्भाची प्रतिरूप विधानसभा आयोजित करणार आहोत. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ​ ५ डिसेंबर रोजी जनजागृती दिंडी आणि ३१ डिसेंबर रोजी सरकारला अंतिम इशारा देणार आहोत. अशी घोषणा यावेळी करण्यात आली​ . महाराष्ट्रवाद्यांनो विदर्भ सोडा, देता की जाता अशा घोषणाबाजी करत अकरा जिल्हे ढवळुन काढणार आहोत. तरीही केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्यास १ जानेवारी २०१७ पासून विदर्भात देता की जनतेच्या लाथा खाता, असे उपरोधक आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहितीही चटप यांनी दिली. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. विदर्भातील जनतेचा अंत पाहू नये, अशी विनंती ही आम्ही करत आहोत असे चटप यांनी स्पष्ट केले .

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages