आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आदिवासी विकास मंत्र्यांनी राजीनामा द्यावा; अन्यथा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे

Share This
19 सप्टेंबरला पालघर जिल्ह्याला भेट देणारमुंबई, दि. 16 सप्टेंबर 2016: आदिवासी बालमृत्युंबाबत अनुद्गार काढणारे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी राजीनामा द्यावा; अन्यथा मुख्यमंत्र्यांनी अशा असंवेदनशील मंत्र्याला मंत्रिमंडळातून तातडीने बडतर्फ करावे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.
सावरा यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध करताना विखे पाटील म्हणाले की, राज्यातील कुपोषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आदिवासी विकास मंत्र्यांच्याच विधानसभा मतदारसंघात कुपोषण होत असून, शासकीय मदतीअभावी बालके मृत्युमुखी पडत आहेत. तरीही त्याची गंभीरतेने दखल न घेतल्या गेल्यामुळे सरतेशेवटी राज्यपालांना संबंधित खात्यांच्या मंत्र्यांची झाडाझडती घ्यावी लागली. हे सरकारचे अपयश आहे. या पश्चातही बालमृत्युंची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आदिवासी विकासमंत्री अशा पद्धतीची असंवेदनशील विधाने करणार असतील तर त्यातून त्यांचा कोडगेपणा दिसून येतो, असे टीकास्त्र विरोधी पक्षनेत्यांनी सोडले.

कुपोषणाचा प्रश्न गंभीर होत असल्याचे आपण यापूर्वी अनेकदा विधानसभेच्या अधिवेशनात सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु, सरकारने आदिवासी भागात उत्तम काम सुरू असल्याचे दावे करून नेहमीप्रमाणे स्वतःची पाठ थोपटून घेतली. सरकारचे हे सर्व दावे फोल ठरल्याचे बालमृत्युच्या वाढत्या संख्येतून स्पष्ट होते, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

राज्याच्या आदिवासी भागातील कुपोषणाचा आढावा घेण्यासाठी पालघर, नंदूरबार आणि मेळघाटचा दौरा करण्याची घोषणाही विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे. या दौऱ्यात ते कुपोषणाच्या गंभीर परिस्थितीची पाहणी व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची समीक्षा करणार आहेत. या राज्यव्यापी दौऱ्याचा पहिला टप्पा म्हणून येत्या 19 सप्टेंबर 2016 रोजी ते पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा परिसराचा दौरा करतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages