खड्ड्याने एका तरुणाचा बळी - स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र पडसाद - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

खड्ड्याने एका तरुणाचा बळी - स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र पडसाद

Share This
मुंबई : जे.जे. उड्डाणपुलाखालील खड्ड्याने एका तरुणाचा सोमवारी बळी घेतल्याचे तीव्र पडसाद बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. विरोधी पक्षांनी प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. मात्र विरोधी पक्ष निशाणा साधत असताना भाजपाने मित्रपक्षाची साथ सोडून विरोधी पक्षांबरोबर सभात्याग केला. 

प्रशासन मुंबईत ३०-३५ खड्डे असल्याचा दावा करीत आहे. पावसामुळे मुंबई मात्र खड्ड्यात गेली आहे. खड्डे वेळेत बुजवले जात नसल्याने जे.जे. उड्डाणपुलाखालील खड्ड्यात बाइक घसरून रिजवान खान या २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केला. त्याचे समर्थन करीत सर्वच विरोधी पक्ष प्रशासनावर बरसले. वॉर्डमधील खड्डे बुजवण्यासाठी ठेकेदार नसले तरी पालिकेनेच खड्डे भरावेत, असे आदेश आयुक्तांनी दिले होते. मात्र वॉर्डमध्ये ठेकेदार नाहीत, असे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी निदर्शनास आणले.

दोनच वर्षांमध्ये रस्ते उखडतात कसे, असा सवाल काँग्रेसचे आसिफ झकारिया यांनी केला. यावर आपली भूमिका मांडताना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी खड्डे बुजवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट बघत होता का, असा टोला लगावला. त्यामुळे खवळलेल्या भाजपाने नाराजी व्यक्त करीत काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि समाजवादी पक्षांसोबत सभात्याग केला. त्यामुळे खड्ड्यांचे खापर शिवसेनेवर फुटले 
आयुक्त मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची वाट बघत होते का, असा असा टोला सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी लगावल्याने भाजपा संतापली. सेनेला असे म्हणायचे असल्यास खड्ड्यांमुळे मुलाचा जीव जाण्याची वाट शिवसेना बघत होती का, असा सवाल भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केला.
अनेक दिवसांपासून मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे आहेत. या प्रकरणी प्रशासनाला धारेवर धरण्याची संधी असताना शिवसेनेने त्यांना अभय दिले. भ्रष्ट ठेकेदार आणि पालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करीत साटेलोटे करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपाने मित्रपक्षावर केला. हे सहन करू शकत नसल्याने सभात्याग केल्याची भूमिका मांडून भाजपाने शिवसेनेलाच खड्ड्यासाठी जबाबदार धरले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages