शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 284 व्यापाऱ्यांविरुद्ध खटले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 284 व्यापाऱ्यांविरुद्ध खटले

Share This
मुंबई - राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेती मालाची खरेदी करताना वजनामध्ये फसवणूक करणाऱ्याविरुद्ध वैध मापन शास्त्र यंत्रणेने कारवाई करत 284 व्यापाऱ्यांच्या दुकानाविरुद्ध खटले दाखल केले आहेत. यामुळे चुकीची अथवा बनावट वजने वापरून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध यंत्रणेने धडक मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे.

राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाजारांमध्ये चुकीची वजने, वजनात बनावटपणा करणे इत्यादी माध्यमांतून शेतकऱ्यांच्या मालाची लूट होत असल्याच्या तक्रारी वैध मापन शास्त्र यंत्रणेकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांनी वैध मापन शास्त्र यंत्रणेस विशेष तपासणी मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते.

या निर्देशानुसार गुप्ता यांनी 21 ते 23 सप्टेंबर 2016दरम्यान राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विशेष तपासणी मोहिम राबविली होती. तक्रारीवरून राज्यातील 177 कृषी उत्पन्न बाजारसमित्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 284 व्यापाऱ्यांच्या दुकानाविरुद्ध खटले दाखल करण्यात आले. यामध्ये वजन-मापांची विहित वेळेत फेरपडताळणी व मुद्रांकन न केल्याबद्दल 241, एकूण क्षमतेच्या 1/10 पट वजन न ठेवणे, पडताळणी प्रमाणपत्र प्रदर्शित न करणे, अप्रमाणित वजने वापरणे या प्रकरणी 43खटले असे एकूण 284 खटले दाखल करण्यात आले असल्याची माहिती गुप्ता यांनी दिली.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांनाही वैध मापन शास्त्र अधिनियम2009, वैध मापन शास्त्र (अंमलबजावणी) नियम 2011 व वैध मापन शास्त्र (आवेष्टित वस्तू) नियम 2011 हे नियम लागू होतात. त्यानुसार कार्यवाही न करता शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध यंत्रणेने कारवाई केली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

सर्व कृषीविषयक उत्पादने घेणाऱ्या सर्व उत्पादक/शेतकरी यांना याव्दारे सूचित करण्यात येते की, कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत बाजारांमध्ये चुकीची वजने, वजनात बनावटपणा करणे इत्यादी माध्यमांतून लूट होत असल्यास क्षेत्रीय वैध मापन शास्त्र कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री बापट व नियंत्रक गुप्ता यांनी केले आहे.

अधिक माहिती व तक्रारीसाठी वैध मापन शास्त्र यंत्रणेचा नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्र. (022-22886666) किंवा ई-मेल dclmms@yahoo.in किंवा dclmms_complaints@yahoo.com अथवा व्हॉटस्‌ॲप नं. 9869691666 व फेसबुक पेज page Legal Metrology Maharashtra consumer grievances व्दारे तक्रारी नोंदवाव्यात,असे गुप्ता यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages