पालिकेच्या दक्षता विभागाच्या कार्यपद्धतींमध्ये आमूलाग्र बदल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिकेच्या दक्षता विभागाच्या कार्यपद्धतींमध्ये आमूलाग्र बदल

Share This
केंद्रीय दक्षता विभागाच्या धर्तीवर प्रत्येक कामावर अधिक प्रभावी देखरेख !
मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध अभियांत्रिकी विभागाकडून करण्यात येणा-या कामांमध्ये सुसूत्रता यावी तसेच केली जाणारी कामे निर्धारित पध्दतीने गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी दक्षता विभागाने सुनिश्चित कार्यप्रणाली व मार्गदर्शक सूचना देण्यासंबंधी नुकतेच एक परिपत्रक लागू केले आहे.


मनपाच्या मध्यवर्ती अभियांत्रिकी विभागाकडून अनेक प्रकारच्या नागरी सुविधा देण्यासंबंधीची कामे करण्यात येतात. त्यामध्ये रस्ते, नालेसफाई, पर्जन्य जलवाहिनी, पाणी, पुरवठा, मलनिस्सारण प्रकल्प, मलनिस्सारण प्रचालन इ. खात्याकडून स्थापत्य, यांत्रिकी, विद्युत या अभियांत्रिकी विभागाच्या प्रकल्पांचा समावेश असतो. या सर्व विभागातील कामांच्या एकंदरीत पर्यवेक्षणाची जबाबदारी त्या-त्या खात्यातील संबंधित अभियंत्यांची असते. अशी अभियांत्रिकी कामे निर्धारित पध्दतीने, विहित दर्जानुसार होण्यासाठी महापालिकेच्या दक्षता विभागाकडून सुध्दा वेळोवेळी पाहणी करण्यात येते. या कामांमध्ये निदर्शनास येणा-या त्रुटी, उणिवा, अनियमितता इ. बाबींचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागास दक्षता विभागाकडून सांगण्यात येते.
दक्षता विभागातील कार्यक्षेत्राचे बळकटीकरण करुन कामाच्या तपासणीमध्ये शिस्तबध्दता आणण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय दक्षता आयोगाच्या कार्यपद्धतीवर आधारित दक्षता विषयक सुनिश्चित नियंत्रण कार्यप्रणाली तयार करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रमुख अभियंता (दक्षता) यांना दिले होते. 

त्यानुसार, प्रमुख अभियंता (दक्षता) यांनी केंद्रीय दक्षता आयोगाने निष्कर्षित व प्रकाशित केलेल्या गोष्टींचा अभ्यास करुन बांधकामामध्ये निर्माण होणा-या संभाव्य समस्यांच्या कार्यक्षेत्रावर कशा प्रकारे नियंत्रण ठेवता येईल यासंबंधी कार्यपध्दती व मार्गदर्शक सूचना महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली तयार केल्या आहेत. यामध्ये दक्षता विभागाच्या बळकटीपणा संबंधी व कार्यकारी विभागाकडून करण्यात येणा-या पर्यवेक्षणाच्या जबाबदारी संबंधी तसेच कंत्राटी कामांच्या विविध अर्हतेच्या अनुवृत्ती (Compliances) संबंधी मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांबरोबर नवीन कार्यप्रणाली अंमलात आणण्यासाठी वस्तुनिष्ठ माहिती विहित तक्त्यामध्ये (Template) भरुन सादर करणे आवश्यक आहे. मनपा आयुक्तांनी सदर कार्यप्रणालीस मंजुरी देऊन याबाबत प्रशासकिय स्तरावर तात्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती मनोहर पवार यांनी दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages