मध्य वैतरणाचे पाणी मुंबईला द्याल तर लक्षात ठेवा - खासदार वनगा यांचा राज्य सरकारला दम - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मध्य वैतरणाचे पाणी मुंबईला द्याल तर लक्षात ठेवा - खासदार वनगा यांचा राज्य सरकारला दम

Share This
तारापूर - दोन दिवसांपूर्वी मध्य वैतरणा प्रकल्पाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असे नाव देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे जिल्ह्यातील एकमेव खासदार चिंतामण वनगा यांना बोलावण्यात आले नाही. याबाबत शनिवारी बोईसर येथे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात वनगा यांनी आपल्या नाराजीला मोकळी वाट करून दिली. मी सर्वसामान्य नागरिक तसेच आदिवासी बांधवांचा प्रतिनिधी आहे. सरकारमध्ये असतानाही जिल्ह्यावर अन्याय करून आमचे पाणी मुंबईला द्याल तर लक्षात ठेवा असा दम वनगा यांनी राज्य सरकारला दिला. राज्य सरकारचे मुंबईचे स्वप्न पाण्याविणा कसे पूर्ण होणार, असा उपरोधीक सवाल करून वनगा यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. 

या वेळी व्यासपीठावर पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, आमदार विलास तरे, कौशल्य विकास आयुक्त विजय वाघमारे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रधान सचिव दीपक कपुर, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, पालघर प्रांत अधिकारी शिवाजी दावभट यांसह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा कौशल्य विकास विभागाकडून पालघर व डहाणू तालुक्यांतील बेरोजगारांच्या आयोजित मेळाव्यात सुमारे 9 हजारांहून अधिक बेरोजगार युवक-युवतींनी उपस्थिती दर्शवली. या मेळाव्यात औद्योगिक वसाहतीतील दोन उद्योजकांशी अशा कुशल युवक युवतींना रोजगार देण्याबाबत व्यवस्थापनाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातून 4310 बेरोजगारांना रोजगार भेटेल असा दावा जिल्हाधिकार्‍यांनी केला आहे. त्यापैकी बॉबे रेयॉन या कंपनीने 1500 बेरोजगारांना रोजगार देण्याचा करार केला आहे. परंतु त्याच कंपनीचे कामगार गेल्या अनेक वर्षांपासून पगारासाठी झगडत असून गेल्या चार ते पाच महिने कामगारांना पगारच मिळत नसल्याने या करारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वैतरणा प्रकल्पाच्या नामकरण सोहळ्यात पत्रकारांना डावलल्याचा निषेध करण्यासाठी पत्रकारांनी या मेळाव्यात काळ्याफिती लाऊन सरकारचा निषेध केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages