मुंबई - महापालिका अधिनियमाच्या अनुसूची "डब्ल्यू" मधील मालमत्तांच्या भाडेपट्ट्याचा कालावधी संपुष्टात आलेल्या मालमत्तांचे जुन्या दराने मानीव नूतनीकरण केल्यास शासनाच्या महसुलाची हानी होऊ शकते. त्यामुळे भाडेपट्टा करार संपुष्टात आल्याच्या लगतच्या दिनांकापासून अस्तित्वात असलेल्या बाजामुल्याच्या दरानुसार 30 वर्षांसाठी आकारणी करून मालमत्तांच्या भाडेपट्टा कराराचे नूतनीकरण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिपरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
बृहन्मुंबई महापालिकेकडील अनुसूची "डब्ल्यू" मध्ये एकूण 160 मालमत्तांचा समावेश आहे. या निर्णयानुसार भाडेपट्ट्याने देण्यात आलेल्या जमिनीचे मुल्य काढताना मुद्रांक शुल्क विभागातर्फे दरवर्षी प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या वार्षिक बाजारमूल्य दर तक्त्यावर (रेडी रेकनर) आधारित भाडेपट्ट्याची आकारणी करण्यात येणार आहे. भाडेपट्ट्याच्या दरात सुधारणा करण्याचा कालावधी 10 वर्षांपर्यंतचा करण्याबाबत तसेच अनुसूची "डब्ल्यू" मधील मालमत्तांच्या भाडेकरारापासून मिळणाऱ्या उत्पन्नातील विशिष्ट रक्कम शासनास देण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 91ब(3) व 91ब(4) मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे.
