मुंबई, दि. 17 : एकाच उत्पादनाच्या दोन वेगवेगळ्या किमती छापून त्याची मॉल व दुकानांमधून विक्री करणाऱ्यांविरुद्ध वैधमापन शास्त्र यंत्रणेने कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी राज्यातील 345 दुकानांची तपासणी करून 134 दुकानांवर खटले दाखल करण्यात आले आहे. तसेच पाच कंपन्यांना नोटिसा देण्यात आले असल्याचे वैध मापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी कळविले आहे.
एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळ्या किमती छापून मॉलमध्ये वेगळ्या किमतीला व इतर दुकानामध्ये एका वेगळ्या किमतीला विक्री करून ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिले होते. या निर्देशानंतर श्री. गुप्ता यांनी राज्यभर गेल्या आठवड्यात विशेष मोहिम राबविली. यामध्ये 345 दुकानांची तपासणी करण्यात आली असून दोषी आढळलेल्या 134 दुकानांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळ्या किमती प्रकरणी 24, छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री प्रकरणी 65 व इतर नियमांच्या उल्लघनप्रकरणी 45 खटले दाखल करण्यात आले आहेत.
तसेच एकाच उत्पादनाच्या दोन वेगवेगळ्या किमती छापल्याप्रकरणी पाच कंपन्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. यामध्ये 1 लिटर किनले पाणी बाटलीची किमत 50 व 20 अशी रुपये अशी छापल्याप्रकरणी हिंदुस्थान कोकाकोला प्रा.लि., 1 लिटर ॲक्वाफिना पाणी बाटलीची किमत 40 व 20 रुपये अशी छापल्याबद्दल पेप्सीको इंडिया होल्डिंग प्रा. लि., रेडबुल शितपेय बाटलीची किमत 145 रुपये व 110 रुपये अशी छापल्याप्रकरणी रेडबूल इंडिया प्रा. लि. आणि 500 मिली ॲक्वाशुअर पाणी बाटलीची किमत 20 व 10 रुपये अशी वेगवेगळी छापल्याबद्दल युरेका फोर्ब्स लि/ पिटेल्स ॲक्वा आणि ॲग्रो फूडस् या कंपन्यांचा समावेश आहे.
विविध दुकाने, मॉल्स, चित्रपटगृहे, हॉटेल्स येथे तपासणी करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबईतील सिनेमा व्हेंचर्स प्रा. लि., मेट्रो मेनलाईन, आयनॉक्स लेसर, नरिमन पॉइंट येथील आर टू मॉल, सुवर्णा फिल्म एंटरप्रायजेस, एरॉस थिएटर, फिनिक्स मिल कपाउंडमधील पी.व्ही.आर. फिनिक्स, चिंचपोकळीतील जयहिंद सिनेमा हॉल,कांदिवलीतील ऑरेंज हॉटेल रेस्टॉरंट, छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील बेकर्स स्ट्रीट, सांताक्रूज विमानतळ येथील शिवसागर व्हेज रेस्टॉरंट, मिलीयम एजन्सी प्रा. लि., अरायव्हल प्लाझा, द ग्रेट कबाब फॅक्टरी,घाटकोपर येथील आयनॉक्स टॉकिज व आरसिटी मॉल, नील स्क्वेअर मॉल, एलबीएस मार्ग येथील कार्निव्हल कंपनी प्रा. लि. यांचा समावेश आहे.
तसेच रायगड जिल्ह्यातील खारघर येथील सिनेमा व्हेंच्युरी प्रा. लि., पीव्हीआर लि.,पनवेलमधील ओरयान मॉल, अप्पार क्रस्ट फूडस् प्रा. लि., ओरियान मॉल, खालापूर येथील ॲडलॅब्स एंटरटेनमेंट लि. आणि पुण्यातील बंडगार्डन येथील आयनॉक्स लेजर लि., हडपसर येथील सिनेपोलीस सिझन मॉल्स, मगरपट्टा येथील आयनॉक्स ॲमनोरा मॉल्स तसेच नागपूरमधील व्हरायटी स्क्वेअर येथील सफायर फूड प्रा. लि. यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
एकाच वस्तूच्या दोन वेगवेगळ्या किमती न छापण्याच्या सूचना संबंधित कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच अशी फसवणूक टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येत आहेत.
पॅकबंद वस्तूंच्या छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करण्याच्या घटना आढळून आल्यास त्याविरुद्ध वैध मापन यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्र. (022-22886666) किंवा ई-मेलdclmms@yahoo.in किंवा dclmms_complaints@yahoo.com, dyclmmumbai@yahoo.in,dyclmkokan@yahoo.in, dyclmnashik@yahoo.com, dyclmpune@yahoo.in,dyclmaurangabad@yahoo.in, dyclmamravati@yahoo.in, dyclmnagpur@yahoo.in या ईमेल पत्त्यावर तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन श्री. गुप्ता यांनी पत्रकाद्वारे केले आहे.