सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण बांगर हे `ऑफिसर ऑफ द मंथ' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 October 2016

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण बांगर हे `ऑफिसर ऑफ द मंथ'

मुंबई - देशभरातील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या केईएम रुग्णालयाचा असणारा लौकिक आणि विश्वासार्हता यामुळे देशभरातून उपचार घेण्यासाठी लोक 'केईएम' मध्ये येत असतात. इथे येणा-या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना वैद्यकीय उपचारांसोबतच आपुलकीच्या भावनेने मार्गदर्शन करण्या-याची गरज असते. हे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी गेली अनेक वर्षे अतिशय समर्पित भावनेने पार पाडणारे केईएम रुग्णालयातील सहाय्यक वैदयकीय अधिकारी डॉ. प्रविण बांगर यांचा `महिन्याचे मानकरी' (ऑफिसर ऑफ द मंथ) या बहुमानाने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आज विशेष सत्कार केला आहे.
महापालिका मुख्यालयातील सभागृहात आयोजित महापालिका अधिका-यांच्या मासिक बैठकी दरम्यान महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन केईएम रुग्णालयातील सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण बांगर यांचाआज सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना महापालिका आयुक्त अजोय मेहता म्हणाले की, महापालिकेच्या केईएम रुग्णालयाद्वारे दिल्या जाणा-या वैद्यकीय सेवांबाबत समन्वयात्मक कार्यवाही करण्यासाठी डॉ. प्रविण बांगर हे अक्षरशः दिवसाचे चोवीसही तास व आठवड्याचे सातही दिवस कार्यरत असतात. एखाद्या संस्थेसाठी'टीमवर्क' आणि 'टीम लीडर' हे जेवढे महत्त्वाचे असतात तेवढेच डॉ.बांगर यांच्यासारखे समर्पित भावनेने आणि निरलस वृत्तीने काम करणारे अधिकारीही आवश्यक असतात. डॉ. बांगर यांच्या अव्याहतपणे व नम्रपणे काम करण्याच्या वृत्तीमुळे केईएम रुग्णालयाच्या आणि पर्यायाने महापालिकेच्या प्रतिमेस अधिक सकारात्मकता लाभण्यास मदत झाली आहे.

डॉ. प्रविण बांगर यांनी नांदेड येथून वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केले असून ते वर्ष २००७ पासून महापालिकेच्या सेवेत आहेत. तर वर्ष २००९ मध्ये केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी (अधिष्ठात / केईएम रुग्णालय) म्हणून ते कार्यरत आहेत. `महिन्याचे मानकरी' (ऑफिसर ऑफ द मंथ) निवडून त्यांचा सन्मान करण्याची पद्धत जानेवारी महिन्यापासून महापालिकेत सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार यावेळी प्रथमच वैद्यकीय क्षेत्रातील अधिका-याचा'ऑफिसर ऑफ द मंथ' या बहुमानाने सत्कार करण्यात आला आहे.

Post Bottom Ad