मुंबई / 18 Oct 2016 - गेली २० वर्षे महापालिकेच्या सत्तेवर राहून शिवसेना भाजपने मराठी तरुणांच्या दोन पिढ्यांच्या शिक्षणाचे नुकसान केले आहे व शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी शिक्षण व्यवस्थेविरोधात काढलेला मोर्चा म्हणजे त्यांना या व्यवस्थेबाबत असलेले अज्ञान आहे. त्यांनी हे दाखवून दिले आहे की ते अजून KG मध्येच आहेत. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे एका पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.
ते पुढे म्हणाले की आदित्य ठाकरे यांना हा मोर्चा काढायचा मुळात अधिकारच नाही. ६ ते १४ वर्षाच्या मुलांना सक्तीचे मोफत शिक्षण मिळावे म्हणून २७ ऑगस्ट २००९ रोजी RTE Act हा कायदा काढण्यात आला. या कायद्यान्वये सर्व मनपा शाळांमध्ये १ ली ते ८ वी मोफत शिक्षणाचे धोरण असताना मनपाच्या ११४३ शाळांपैकी फक्त १०% शाळांमध्येच ८ वी पर्यंत शिक्षण दिले जाते. तसेच १५३ नवीन शाळांमध्ये ८ वी पर्यंतचे शिक्षण देण्याचा प्रस्ताव मुर्खापणाने जूनमध्ये शाळा सुरु झाल्यावर आणला. त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही. या सत्ताधाऱ्यांना यातील बहुतांश शाळांमध्ये अजून कॉम्प्युटर रूम, वाचनालय, प्रयोगशाळा अशा मुलभूत सुविधा सुद्धा उपलब्ध करून देता आल्या नाहीत आणि आता हेच लोक शिक्षण कसे असायला हवे यावर बोलतात, ही हास्यास्पद गोष्ट आहे. एकीकडे पालिका सांगते की आमच्याकडे जरुरी पेक्षा जास्त शिक्षक आहेत. परंतु माहितीच्या अधिकाराखाली मिळालेली माहिती ही पूर्णपणे वेगळी आहे. शिक्षकांची कमतरता ही सर्व माध्यमांमध्ये असून २०१३-१४ पर्यंत १२०, २०१४-१५ पर्यंत ४०० आणि २०१५-१६ पर्यंत १५० अशा एकूण ६७० शिक्षकांची गरज असल्याचे पत्र माजी आयुक्त सिताराम कुंटे यांनी स्वतः शिक्षणमंत्र्यांना लिहिले होते. पालिकेच्या एकाच वर्गात २ ते ३ तुकड्या शिकवण्याचा जावईशोध या सत्ताधाऱ्यांनी लावला असून त्याला हे जोडवर्ग पद्धती म्हणतात व भाजपाचे मंत्री त्याला प्रगत शिक्षण म्हणतात. मग हे जर प्रगत शिक्षण आहे तर ही पद्धत खाजगी शाळांमध्ये का लागू केली जात नाही. गरिबांच्या मुलांना वेगळा न्याय का? आधीच शिक्षणावरचा खर्च वाढला असताना यावेळच्या अर्थसंकल्पात १६९ कोटी रुपये कमी केले गेले. यावरून या सत्ताधाऱ्यांची खरी मानसिकता व शिक्षणाबद्दलची आस्था दिसून येते.
डॉ वाघमारे पुढे म्हणाले की ठाकरे कुटुंबाला असे दाखवण्याची हौस आहे की आम्हाला शिक्षणाबद्दल फार आवड आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्यांनी पालिकेच्या ११०० शाळांपैकी २४७ शाळांमध्ये वर्चुअल क्लासरूम सुरु केला होता. तोसुद्धा आता बंद करण्याची वेळ आली आहे. आदित्य ठाकरेंचा आवडता प्रोजेक्ट टॅब, त्यामध्येही निकृष्ट दर्जाचे टॅब मुलांना देण्यात आले. या टॅबमध्ये फक्त ८ वी पर्यंतचा अभ्यासक्रम भरून देण्यात आला आहे व ९ वी आणि १० वी चा अभ्यासक्रम हा मुलांनी स्वतः १०,००० किवा त्याहून अधिक पैसे भरून घ्यावा अशी मेख त्यात मारली आहे. मनपा शाळेत शिकणारी मुले एवढे पैसे कुठून आणणार. या टॅबचा घोटाळा हा ३२ करोडचा आहे. मुलांना मिळत असलेल्या खिचडीचा दर्जा सुद्धा अतिशय सुमार असून त्याऐवजी दुध किंवा फळेसुद्धा मुलांना देता येऊ शकतात. या सर्व गोष्टीमुळे मनपा शाळेतून ४०% मुलांची गळती झाली आहे. हे सेना भाजपावाले मराठी माणसांची प्रगती व्हावी असे म्हणतात. पण या मराठी मुलांना वडापावची गाडी, पावभाजीची गाडी टाकण्यापुरते किंवा ड्रायव्हर ची नोकरी करण्या इतपत शिक्षण या पालिका प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे घेता येते. असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे म्हणाले.