मुंबई, दि. 18 : मुंबई व ठाणे शिधावाटप क्षेत्रातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत कौटुंबिक शिधापत्रिकेवर ऑक्टोबर 2016 साठी देण्यात येणाऱ्या अन्नधान्याचे परिमाण जाहीर झाले आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंबातील लाभार्थीसाठी शिधापत्रिकेवर वितरीत करावयाच्या धान्याचे परिमाण प्रति व्यक्ती 2 किलो तांदूळ, 3 रुपये प्रतिकिलो आणि 3 किलो गहू 2 रुपये प्रतिकिलो असे आहे.
अंत्योदय अन्न योजनेच्या लाभार्थीसाठी शिधापत्रिकेवर एकूण 35 किलो धान्य देण्यात येणार आहे. त्यापैकी 18 किलो तांदूळ 3 रुपये प्रतिकिलो व 17 किलो गहू 2 रुपये प्रतिकिलो या दराने उपलब्ध होणार आहे. दारिद्र्य रेषेखालील पिवळ्या शिधापत्रिकाधारकांसाठी ऑक्टोबर महिन्यासाठी दर माणसी 660 ग्रॅम साखर 13.50 रुपये प्रतिकिलो दराने देण्यात येणार आहे. त्यासाठी 1144 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे.
तसेच या क्षेत्रासाठी 2892 किलोलिटर रॉकेलचे नियतन मंजूर करण्यात आले असून बिगर गॅसधारक शिधापत्रिका धारकांसाठी एक व्यक्तीसाठी 2 किलोलिटर, 2 व्यक्तिंसाठी 3 किलोलिटर आणि 3 व त्यावरील व्यक्तिंसाठी 4 लिटर रॉकेल वाटप करण्यात येणार आहे. केरोसिनचा किरकोळ दर 16.66 रुपये प्रतिलिटर असल्याची माहिती शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा विभागाचे प्रभारी नियंत्रक यांनी कळविली आहे.