ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाई

Share This
Image result for mantralaya
मुंबई, दि. १८ : ध्वनी प्रदुषणाची वाढती पातळी व विविध प्रकारचे प्रदूषण विचारात घेता शासनाचे विविध विभाग ध्वनीप्रदूषण नियंत्रण व नियमनाची अंमलबजावणी करीत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात दिवसा म्हणजेच सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत ७५डेसीबल तर रात्रीच्या वेळेस म्हणजेच रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ७० डेसीबल , व्यावसायिक परिसरात दिवसा ६५ डेसीबल तर रात्री ५५ डेसीबल, निवासी परिसरात दिवसा ५५ डेसीबल तर रात्रीच्यावेळेत ४५ डेसीबल आणि शांतता क्षेत्रात दिवसा ५० डेसीबल तर रात्री ४० डेसीबल इतकी ध्वनीमर्यादा असणे आवश्यक आहे. उल्लंघन झाल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. याचप्रमाणे फटाके बनविणा-या कंपन्यांनी किंवा विक्रेत्यांनी १२५ डेसीबल पेक्षा जास्त आवाजाचे किंवा अग्नीदाहक परिसरापासून ४ किलोमीटर अंतरावर १४५ डेसीबल पेक्षा जास्त आवाजाच्या फटाक्यांचा वापर करू नये.

राज्यातील पोलीस आयुक्त असलेल्या शहरांमध्ये पोलीस आयुक्‍त किंवा पोलीस उप आयुक्त आणि इतर क्षेत्रामध्ये संबंधीत पोलीस अधिक्षक किंवा पोलीस उप अधीक्षक दर्जाचा अधिकारी यांची ध्वनी प्रदूषण नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी ध्वनी प्राधिकरण अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे.

राज्यात ध्वनीवर्धक व ध्वनिक्षेपक यांचा वापर श्रोतृगृह, सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागा खेरीज इतर सणांचे दिवस म्हणजेच १५ दिवसांसाठी फक्त ध्वनीची विहीत मर्यादा राखून सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत करता येणार आहे. ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्याबाबतीची सूट १५ दिवसांपेक्षा जास्‍त होणार नाही व ही सूट शांतता क्षेत्रात लागू नसल्याने याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व ध्वनी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरण यांची आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व संबंधित महानगरपालिका हे एकत्रित रित्या समन्वय साधून महानगरपालिका क्षेत्रांसाठी ध्वनी मॅपींग करण्यात येणार आहे. ज्या क्षेत्रात नियमांचे पालन होणार नाही अशा क्षेत्रात संबंधीत अधिका-यांमार्फत नियमांनुसार कारवाई करण्यात येणार आहे.

ध्वनी प्रदुषण नियम २००० ची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता स्थानिक शहरी भागात शांतता झोन जाहीर करण्यात आले आहेत. यानुसार शैक्षणिक संस्था, सर्व न्यायालय आणि रूग्णालयाच्या परिसरात १०० मीटर चे क्षेत्र शांतता क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages