सोमवार पर्यंत रस्त्यांवरील सर्व खड्डे भरण्याचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 October 2016

सोमवार पर्यंत रस्त्यांवरील सर्व खड्डे भरण्याचे आदेश

महिना अखेर पर्यंत ३०० रस्त्यांची कामे सुरु होणारमुंबई / 15 Oct 2016 - दि. १ ऑक्टोबर २०१६ रोजी पार पडलेल्या मासिक आढावा बैठकी दरम्यान मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील रस्ते दुरुस्तीची कामे व रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कार्यवाही सर्वेाच्च प्राधान्याने करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी प्रमुख अभियंता (रस्ते) व सर्व संबंधित सहाय्यक आयुक्त यांना दिले होते. त्यानुसार सुरु झालेली कार्यवाही व प्रस्तावित कामे याचा सविस्तर आढावा महापालिका आयुक्तांनी परिमंडळीय उपायुक्तांच्या दि.१४ ऑक्टोबर २०१६ रोजी सायंकाळी संपन्न झालेल्या बैठकीत घेतला. तसेच या बैठकी दरम्यान पुढील कार्यवाहीची दिशादेखील निश्चित करण्यात आली. 
मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरण्याचे निश्चित करण्यात आले होते. तथापि,सततच्या पावसामुळे यात अडचणी आल्या.आता पाऊस पूर्णतः थांबलेला असल्याने रस्त्यांवरील सर्व खड्डे सोमवार दि. १७ ऑक्टोबर २०१६ पर्यंत सुयोग्यप्रकारे भरावेत, असे आदेश महापालिका आयुक्तांनी सर्व परिमंडळीय उपायुक्तांना दिले. यामध्ये दोषदायित्व कालावधी अंतर्गत (Defect Liability Period)असणारे रस्ते व दोषदायित्व कालावधी अंतर्गत नसणारे रस्ते (non-DLP Roads) या दोन्ही प्रकारच्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा समावेश आहे.

दोषदायित्व कालावधी अंतर्गत (Defect Liability Period) असणा-या रस्त्यांबाबत संबंधित कंत्राटदाराकडून खड्डे भरण्याची सुयोग्य कार्यवाही तातडीने करवून घेण्यात यावी. संबंधित कंत्राटदार खड्डे भरण्याची कार्यवाही करत नसेल किंवा टाळाटाळ करत असेल, तर अशा परिस्थितीत सदर कार्यवाही महापालिकेद्वारे करण्यात यावी. यासाठी झालेला खर्च संबंधित कंत्राटदाराच्या देयकातून वसूल करण्यात यावा,तसेच या कंत्राटदारांवर महापालिकेच्या नियमांनुसार कडक कारवाई करण्यात यावी, असे आदेश देखील बैठकी दरम्यान देण्यात आले.

१०० रस्ते तयार करण्याबाबतची कामे येत्या सोमवार पासून म्हणजेच दि. १७ ऑक्टोबर २०१६ पासून हाती घेण्यात येणार आहेत. तसेच या महिना अखेर पर्यंत आणखी २०० रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. याप्रमाणे ऑक्टोबर २०१६ च्या अखेरपर्यंत महापालिका क्षेत्रातील ३०० रस्ते करण्याची कामे सुरु होणार आहेत.

आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण १००४ रस्ते तयार करण्याची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. यापैकी ३०० रस्त्यांची कामे ऑक्टोबर अखेर पर्यंत सुरु होणार आहेत. उर्वरित रस्त्यांची कामे ३१ मे २०१७ पूर्वी पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देखील महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. उर्वरित रस्त्यांच्या कामांबाबत पोलीस व वाहतूक पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून कालबद्ध कृती आराखडा निश्चित करावा व आराखड्यानुसारच कार्यवाही पूर्ण होईल याची नियमितपणे खात्री करुन घ्यावी.

रस्त्यांबाबतची कामे जिथे सुरु असतील त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार व्यवस्थितपणे बॅरिकेड्स लावणे, संबंधित सूचना फलक लावणे,तसेच सर्व कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीनेच केली जात आहेत; यासर्व बाबी सुयोग्यप्रकारे होत असल्याची खात्री नियमितपणे करुन घ्यावी.

वरील सर्व बाबतीत रस्त्यांची सर्व कामे निर्धारित वेळापत्रकानुसार व गुणवत्तापूर्ण पद्धतीनेच व्हावीत यासाठी संबंधित परिमंडळीय उपायुक्त व सहाय्यक आयुक्त यांनी काम सुरु असलेल्या ठिकाणांना वेळोवेळी भेटी द्याव्यात व सर्व कामांचा नियमितपणे आढावा घ्यावा, असेही आदेश महापालिका आयुक्तांनी परिमंडळीय उपायुक्तांच्या बैठकी दरम्यान दिले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS