मुंबई / 15 Oct 2016 - मुंबई प्रमाणेच अंधेरीत ठीक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुले लोकांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याने उत्तर पश्चिम जिल्हा कोंग्रेस कमिटीच्या वतीने पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत पालिकेने दोन दिवसात खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले आहे.
मुंबई महानगरपालिका 35 खड्डे बुजवण्याचे शिल्लक असल्याचे जाहिरपणे सांगत असली तरी अंधेरी मधील कॅप्टन सावंत मार्ग, विरा देसाई क्वारी रोड, अक्सा मस्जिद रोडवर 500 ते 600 खड्डे पडले आहेत. कॅप्टन सावंत मार्गावरून अंधेरी पश्चिम ते जोगाश्वरी पूर्व वाहतुक केली जाते. या मार्गावर खड्डे असल्याने येथील रहिवाश्यांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेत उत्तर पश्चिम जिल्हा कोंग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करत खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. पालिका प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली. रस्त्यावरील खड्डयांना पालिका अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक आंबेरकर यांनी केली. यावेळी पालिकेचे कार्यकारी अभियंता कांबळे, सहाय्यक अभियंता मोहिते, सह अभियंता रस्ते यांनी भेट दिली व दोन दिवसात खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देवेंद्र आंबेरकर यांनी दिली. आंबेरकर यांच्यासह नगरसेविका ज्योत्सना दिघे व काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजार होते.

