प्रगणनेनंतरही शिल्लक राहिलेल्या दिव्यांग व्यक्तिंच्या नोंदणीसाठी आवाहन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रगणनेनंतरही शिल्लक राहिलेल्या दिव्यांग व्यक्तिंच्या नोंदणीसाठी आवाहन

Share This
मुंबई / प्रतिनिधी - बृहन्मुंबई महानगरपालिका शहर व उपनगर क्षेत्रातील निःसमर्थ, दिव्यांग (अपंग) व्यक्तिंची नोंद संकलित करण्याकरीता सर्व स्थानिक रहिवाश्यांच्या घरी जाऊन प्रगणना करण्याचे क्षेत्रीय काम दिनांक १५ मार्च, २०१६ पासून महापालिकेतर्फे सुरु करण्यात आले आहे. तथापि, ज्या दिव्यांग व्यक्तिंची अद्यापही नोंद झाली नसेल, त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह विभागीय कार्यालयांमध्ये संपर्क साधावा आणि नोंद करुन घ्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
महापालिकेच्या प्रगणकांनी प्रत्येक घरास प्रत्यक्ष भेट देऊन घरातील निःसमर्थ, दिव्यांग (अपंग) व्यक्तिंचे अपंग असल्याचे प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, सर्व सदस्यांची माहिती, दारिद्रय़ रेषेचा क्रमांक, आधार कार्ड तसेच शिधावाटप पत्रिकेसंबंधीची माहिती घेऊन दिव्यांग (अपंग) व्यक्तिंची नोंदणी केली आहे. तरीही काही दिव्यांग (अपंग) व्यक्तिंची नोंद राहिली असल्यास, दिव्यांग नोंदणी करण्यासाठी निःसमर्थ, दिव्यांग (अपंग) व्यक्तिंच्या माहितीसंबंधी प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती, सत्यप्रतींसह विभागीय सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र, सर्व कुटुंब सदस्यांची माहिती, आधार कार्ड क्रमांक, व्यवसाय प्रशिक्षण, शैक्षणिक प्रमाणपत्र, दारिद्रय़ रेषेचा क्रमांक, शिधावाटप पत्रिका, नोकरी या संदर्भातील माहितीच्या मूळ प्रती व सत्यप्रती नोंदणीकरीता सोबत आणाव्यात. ही माहिती सादर करुन दिव्यांग व्यक्तिंच्या नोंदणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages