कमाल अनुदान रक्कम १० हजारांवरुन २५ हजार रुपये
मुंबई / प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गटांना महापालिकेद्वारे दिल्या जाणा-या अनुदानात १५ हजार रुपयांची वाढ करण्यास महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी नुकतीच प्रशासकीय मंजूरी दिली आहे. ज्यामुळे आता ही रक्कम १० हजार रुपयांवरुन २५ हजार रुपये करण्यात आली आहे. महिला बचत गटांची सभासद संख्या ही १० ते २० इतकी असते. यानुसार प्रत्येक सभासदामाग रुपये २ हजार याप्रमाणे जास्तीत जास्त रुपये २५ हजार एवढी रक्कम महिला बचत गटांना दिली जाणार आहे.
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात अनेक विकासपुरक बाबी आणि कल्याणकारी योजना याविषयची कार्यवाही आणि अंमलबजावणी महापालिकेच्या नियोजन खात्याद्वारे केली जाते. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने 'जेंडर बजेट' अंतर्गत अनेक बाबींचे समन्वयन देखील याच खात्याद्वारे पार पाडले जाते. 'जेंडर बजेट' मध्ये महिला बचत गटांना खेळत्या भांडवलासाठी दिल्या जाणा-या अनुदानाचाही यात समावेश होतो.
महिला बचत गटांसाठी असणा-या अनुदान विषयक अर्थसंकल्पीय तरतूदीतून महिला बचत गटांना त्यांच्या सभासद संख्येवर आधारित अनुदान महापालिकेद्वारे दिले जाते. गेल्यावर्षी हे अनुदान प्रति सभासद रुपये १ हजार एवढे होते. आता या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली असून ही रक्कम आता प्रति सभासद रुपये २ हजार एवढी करण्यात आली आहे. तसेच गेल्यावर्षी प्रत्येक महिला बचत गटाला जास्तीत जास्त रुपये १० हजार अनुदान स्वरुपात मिळू शकत होते. या रकमेत देखील आता अडीच पट वाढ करण्यात आली असून ही रक्कम आता रुपये २५ हजार एवढी करण्यात आली आहे. ही अनुदान रक्कम प्रत्येक महिला बचत गटाला केवळ एकदाच दिली जाते. ज्या महिला बचत गटांना राष्ट्रीयकृत बँकेत किंवा सारस्वत सहकारी बँकेत खाते उघडून ६ महिने झाले आहेत, असे गट या अनुदानासाठी पात्र ठरु शकणार आहेत.
'जेंडर बजेट' अंतर्गत आर्थिक वर्ष २०१६ – १७ मध्ये महिला बचत गटांना दिल्या जाणा-या अनुदानासाठी रुपये २ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या अनुदानासाठी अर्ज करावयाचा असल्यास संबंधित बचत गटांनी आपल्या परिसरासाठी असणा-या महापालिकेच्या विभाग कार्यालयातील (वॉर्ड ऑफीस) 'नागरी दारिद्र्य निर्मूलन कक्ष' येथे संपर्क साधावा, असे आवाहन नियोजन खात्याच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment