मुंबई : झोपड्यांवर वाढवण्यात येणारे अनधिकृत मजले तोडण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. गोवंडी शिवाजीनगर परिसरातदेखील अशाच प्रकारच्या कारवाईसाठी आलेल्या पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांवर येथील रहिवाशांनी दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनादेखील सौम्य लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गोवंडी शिवाजीनगर परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. पालिकेकडून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेताच, या ठिकाणी तीन ते चार मजल्यांची घरे बांधण्यात आली आहेत. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी पालिका पुढे आली आहे. बुधवारी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईसाठी पालिका अधिकारी आणि पोलीस कर्मचारी शिवाजीनगर परिसरात आले होते. पालिका कर्मचाऱ्यांनी कारवाईला सुरुवात करताच, येथील रहिवाशांनी त्याला विरोध दर्शवला. त्यामुळे पोलीस या रहिवाशांना बाजूला करण्यासाठी पुढे सरकले असता, काही रहिवाशांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर, पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.