मुंबई दि 18 : केंद्र शासनाने सन 1986 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2016 ते शुक्रवार 25 नोव्हेंबर 2016 हा सप्ताह कौमी एकता सप्ताह म्हणून राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे. कौमी एकता सप्ताहाच्या निमित्ताने शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2016 रोजी राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यात येणार आहे. धर्मनिरपेक्षता, जातीयवादी विरोध व अहिंसा यांच्यावर भर देणारे सभा, चर्चासत्रे आणि परिसंवाद या निमित्ताने राज्यभरात आयोजित करण्यात येतील.
19 नोव्हेंबर 2016 रोजी आपण सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घ्यावयाची आहे. रविवार दिनांक 20 नोव्हेंबर 2016 हा अल्पसंख्याक कल्याण दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी 15 कलमी कार्यक्रम राबविण्यावर भर देण्यात येणार आहे. सोमवार 21 नोव्हेंबर 2016 हा दिवस भाषिक सुसंवाद दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. भारताच्या अन्य भागातील लोकांच्या भाषेचा वारसाचा परिचय करुन देण्याच्या दृष्टीने विशेष वाडमयीन कार्यक्रम व कवी संमेलने आयोजित करण्यात येतील.मंगळवार दिनांक 22 नोव्हेंबर 2016 हा दिवस दुर्बल घटक दिवस असणार आहे. 20 कलमी कार्यक्रमाअंतर्गत अनुसूचित जाती व जमाती मधील व्यक्ती व कमकुवत घटकातील व्यक्ती यांना मदत करण्यासाठी ठरवून दिलेले कार्यक्रम यावेळी करण्यात येतील. बुधवार दिनांक 23 नोव्हेंबर 2016 हा दिवस सांस्कृतिक एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. या दिवशी भारतीयांच्या विविधतेतील एकतेवर भर देणारे आणि सांस्कृतिक संरक्षण व एकात्मता संबंधाची भारतीय परंपरा सादर करणारे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणत येतील. गुरुवार दिनांक 24 नोव्हेंबर 2016 हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येईल या दिवशी भारतीय समाजातील महिलांचे महत्व व राष्ट्र उभारणीच्या विकासामधील त्यांची भूमिका यावर भर देण्यात येणार आहे. शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर 2016 हा दिवस जोपासना दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. या दिवशी पर्यावरणाची जोपासना व त्याची जाणीव यासाठीच्या वाढत्या गरजेवर भर देणारे मेळावे व कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. सदर दिवशी कार्यक्रमाची रुपरेषा लक्षात घेऊन ध्वजारोहण, मिरवणूका व सभा, राष्ट्रीय एकात्मतेची शपथ, चर्चासंमेलने, चित्रपट दाखविणे व प्रदर्शने अश्या माध्यमांचा उपयोग करता येईल.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201611111638419814 असा आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्याwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201611111638419814 असा आहे.