औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन यंत्रणेच्या अत्याधुनिकीकरणासाठी आराखडा - उद्योगमंत्री सुभाष देसाई - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन यंत्रणेच्या अत्याधुनिकीकरणासाठी आराखडा - उद्योगमंत्री सुभाष देसाई

Share This
मुंबई, दि. 19 Nov 2016 : औद्योगिक क्षेत्रातील अग्नि सुरक्षेला राज्य शासन प्राधान्याने पाहत असून ही येथील अग्निशमन यंत्रणा अधिक अत्याधुनिक व दर्जेदार करण्यासाठी उद्योग विभागाने आराखडा तयार केला जात आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व खणिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केले.

फायर प्रोटेक्शन असोसिएशन ऑफ इंडिया व राष्ट्रीय अग्निशमन अधिकारी महासंघाच्या वतीने हॉटेल सहारा इंटरनॅशनल येथे आयोजित औद्योगिक अग्नि सुरक्षा तांत्रिक परिषदेचे उद्घाटन देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी फायर प्रोटेक्शन ऑफ इंडियाचे संचालक मनिष गांधी, नितीन शहा, नितीन देसाई,अग्निशमन सल्लागार डी. के. सामी, मुंबई अग्निशमन दलाचे संचालक प्रभात रहांगदळे राष्ट्रीय अग्निशमन अधिकारी महासंघाचे अध्यक्ष संचालक एम. व्ही. देशमुख, महासचिव संतोष वारिक,सल्लागार एस. के. डेरी, आदी यावेळी उपस्थित होते.

देसाई म्हणाले की, देशाची संपत्ती वाचविण्याचे महत्त्वपूर्ण काम अग्निशमन अधिकारी व कर्मचारी सतत करत असतात. महाराष्ट्र शासनानेही औद्योगिक सुरक्षेला प्राधान्य दिले असून राज्यातील औद्योगिक क्षेत्रात 30 अग्निशमन केंद्रे असून आणखी 5 अग्निशमन केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. ही सर्व केंद्रे अत्याधुनिक यंत्रसामग्रीने युक्त असतील. आगीच्या घटना टाळण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजना करण्यात येत आहेत. परंतु कंपन्या अथवा फॅक्टरीमध्ये आग लागल्यानंतर कमीत कमी नुकसान होईल, याकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. औद्योगिक विकासात महाराष्ट्र देशात आघाडीवरचे राज्य आहे. उद्योगांच्या सोयीसाठी मैत्री कक्षाची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे 16 विभागाचे अधिकारी एकाच ठिकाणी सर्व परवाने, मंजुरी व ना हरकत प्रमाणपत्रे देत आहेत. उद्योगांना लवकरात लवकर परवानगी देत असताना अग्नि सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड राज्य शासन करत नाही, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages