मुंबई / प्रतिनिधी 17 Nov 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० व १००० रुपयाच्या नोटा चलनातून नाहीसे केल्यामुळे सर्व सामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत. जनतेला स्वतःचेच कमावलेले पैसे बँकेतून बदलून घेण्यासाठी बँकेच्या बाहेर तासंतास रांगेत उभे राहावे लागत आहे. याचा लोकांना प्रचंड मनस्ताप होत आहे. आत्तापर्यंत रांगेत ३७ जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. यासाठीच मुंबई काँग्रेसतर्फे २२ नोव्हेंबर पासून नरेंद्र मोदी यांच्या चुकीच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी, ५०० व १००० रुपयाच्या नोटाबंदिसंदर्भात “नोट पे चर्चा” अभियान सुरु करीत आहोत. हे अभियान मार्केट, स्टेशन, मैदानात, बँकेबाहेर किंवा बँकेजवळ होणार असून यामध्ये आम्ही जनतेत जाऊन जनतेशी संवाद साधणार आहोत. त्यांना पटवून देणार आहोत की नरेंद्र मोदींचा हा निर्णय कसा व किती चुकीचा आहे. मुंबई काँग्रेसतर्फे लवकरच प्रचंड मोठ्या प्रमाणात निदर्शने व मोर्चे काढण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की नोटाबंदिमुळे कोणाच्याच घरात लग्न होत नाही आहेत, रुग्णांना उपचार मिळत नाही आहेत. डायमंड मार्केट, ज्वेलरी मार्केट, रिटेल मार्केट, हॉटेल इंडस्ट्री, हेल्थकेअर इंडस्ट्री, होम अप्लायांस, फार्मा इंडस्ट्री, लेदर इंडस्ट्री, कपडा मार्केट सर्व इंडस्ट्री ७० ते ८० टक्के डाऊन झालेली आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात बेरोजगारी निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी म्हणतात काळा पैसा व भ्रष्टाचार रोखण्यासाठी हे त्यांनी पावूल उचललेले आहे. माझा त्यांना असा सवाल आहे की, ५०० व १००० रुपयांची नोट बंद करून मग त्यांनी एकदम २००० रुपयांची नोट का काढली. त्यामुळे काळा पैसा व भ्रष्टाचार करणार्यांचे फावणार आहे. आमच्या माहितीनुसार मोदीजी नोटाबंदीची घोषणा करण्याआधीच त्यांच्या मर्जीतील नेते व उद्योगपती यांना मोदिजींनी आधीच याची कल्पना दिली होती. तेव्हा त्यांनी आपला पैसा फिरवून घेतला, त्यांना काहीच अडचण झाली नाही परंतु त्रास मात्र सामान्य जनतेला व गरीब लीकांना होत आहे. अशी परिस्थिती अजून ७ महिने चालणार आहे कारण आपल्याकडे नोटा छापण्याच्या मशीनची मर्यादा ३०० करोड एवढीच आहे. त्यापेक्षा आपण जास्त छापू शकत नाही आणि आपल्याला गरज आहे २३०० करोडची नोटा छापण्याची. एवढ्या नोटा छापायला किमान ७ महिने जातील, त्यामुळे आत्ता जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती अजून ७ महिने राहणार आहे किंवा त्याही पेक्षा जास्त काळ लागू शकतो.
संजय निरुपम पुढे म्हणाले की, विजय माल्या सारख्या कर्ज बुडवे ६३ उद्योगपतीचे कर्ज भाजापा सरकारने माफ केले आहे हा एक खूप मोठा भाजपाचा व नरेंद्र मोदींचा घोटाळा आहे. ६३ उद्योगपतीचे कर्ज सुमारे ७००० करोड रुपये भाजापा सरकारने माफ केले आहे. यामागे काय कारण आहे हे मोदिनी जनतेला सांगावे. नरेंद्र मोदिनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी २५,००० करोड रुपये वापरले, एवढे पैसे कुठून आले. ते पैसे सफेद की काळे, हे हि जनतेसमोर त्यांनी स्पष्ट करावे. शेवटी संजय निरुपम म्हणाले की, आजच सरकारने जाहिर केले की यापुढे फक्त २००० रुपयांच्याच नोटा बँकेतून बदलू शकतो त्यामुळे याही पेक्षा भयंकर परिस्थिती देशात निर्माण होणार आहे. हे सरकार सामान्य जनतेला वेठीस धरत आहे. हा त्रास मनस्ताप फक्त आणि फक्त सामान्य जनतेला होत आहे. नरेंद्र मोदींचा हा चुकीचा निर्णय त्यांनी जाहिर केला परंतु तो राबवण्यासाठी सरकारकडे कोणतीच सक्षम व्यवस्था नाही आहे. जनतेचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. मुंबई काँग्रेसतर्फे रांगेत उभे राहणाऱ्या जनतेसाठी ठीकठीकाणी पिण्याच्या पाण्याची तसेच बिस्किटांची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सोबत माजी आमदार चरण सिंग सप्रा, प्रवक्ते अरुण सावंत आणि जिल्हाध्यक्ष सुनील नरसाळे उपस्थित होते.