मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबई मध्ये दिवाळीच्या गेल्या आठ दिवसात फटाक्यांमुळे मुंबईत ४२ ठिकाणी भीषण आगी लागण्याच्या घटना घडल्या. त्यात पश्चिम उपनगरात सर्वाधिक १८ ठिकाणी आगी लागल्या असून या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे सांगण्यात आले.
२५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत मुंबईत फटाक्यामुळे लागलेल्या आगीचा लेखाजोखा अग्निशमन दलाने मांडला आहे. या आठ दिवसात ४२ ठिकाणी फटाक्यामुळे आगी लागल्या. त्यात शहरात १२, पूर्व उपनगरात १२ आणि पश्चिम उपनगरात १८ ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आठ दिवसात दोन गगनचुंबी इमारतींना आगी लागल्या आहेत. तर तीन ठिकाणी इमारतीच्या टेरेसवर आगी लागल्या आहेत. याशिवाय गोडाऊन आणि घरे आदी १७ ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. दिवाळीच्या दिवसात फटाके फोडल्यामुळे या आगी लागण्याच्या घटना घडल्याचे अग्निशमन दलाकडुन सांगण्यात आले. ३० ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी सर्वात जास्त आगी लागल्या आहेत. या दोन्ही दिवशी इतर दिवसांच्या तुलनेत प्रत्येकी सात ठिकाणी आगी लागल्या आहेत. या आगी पूर्व आणि पश्चिम उपनगरात लागलेल्या आहेत.