महापालिका रुग्णालयांत एमआरआयसाठी 4 महिन्यांची तारीख - रुग्णांचे हाल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महापालिका रुग्णालयांत एमआरआयसाठी 4 महिन्यांची तारीख - रुग्णांचे हाल

Share This
मुंबई ( प्रतिनिधी ) - पालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात एका गरीब रुग्णाला एमआरआय करण्यासाठी डॉक्टरांनी चक्क चार महिन्यांची तारीख दिल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या असुविधांमुळे पालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी येणा-या शेकडो रुग्णांचे हाल झाले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी स्थायी समितीत केला. पालिकेच्या रुग्णालयातील असुविधांबाबत बुधवारी छेडा यांनी हरकतीचा मुद्दा मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी समर्थन करून प्रशासनाविरोधात चांगलाच संताप व्यक्त करत पालिकेवर तासोरे ओढले

मुंबई पालिका रुग्णालयात उपचार मिळतील या अपेक्षेने राज्याच्या कानाकोप-यातून गरीब रुग्ण दाखल होतात. मात्र अनेक रुग्णांना सुविधांअभावी वेळेत उपचार मिळत नसल्याने खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. पालिकेच्या रुग्णालयात सिटीस्कॅन, स्पाईन एमआरआय मशिन उपलब्ध नसल्याने रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नाहीत. लोकमान्य टिळक रुग्णालयात एक गरीब रुग्ण उपचारासाठी गेला असता त्याला डॉक्टरांनी एमआरआय करावे लागेल, त्यानंतर उपचार सुरू होतील असे सांगितले. मात्र एमआरआय करण्यासाठी डॉक्टरांनी संबंधित रुग्णाला चार महिन्यांची तारीख दिली. आजाराने त्रस्त असलेला व बाहेरचा उपचार घेता येणे शक्य नसलेल्या या रुग्णाला चार महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी याबाबतचा हरकतीचा मुद्दा मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. या मुद्द्याला समर्थन करीत पालिकेच्या इतरही रुग्णालयातील असुविधांबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाढा वाचला. पालिकेच्या रुग्णालयांसाठी अर्थसंकल्पात 2700 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली असतानाही अनेक रुग्णांना सुविधेअभावी महागड्या खासगी रुग्णालयात जावे लागते, याचा नगरसेवकांनी संताप व्यक्त केला.

पालिकेच्या केईएम या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रुग्णालयात स्पाईन एमआरआय मशिन मागील चार वर्षापासून बंद अवस्थेत आहे. येथे रोज रुग्णांची गर्दी होत असतानाही ही मशिन उपलब्ध करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक सुनील मोरे यांनी केला. योग्य उपचार न झाल्याने रुग्णांचा आजार अधिक बळावतो. सुविधा वेळेत मिळाव्यात अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक रमाकांत कोरगावकर यांनी केली. तर सुविधा उपलब्ध करण्यास हलगर्जीपणा करणा-या संबंधितांची चौकशी व्हावी अशी मागणी केली. पालिकेच्या सर्व रुग्णालयांत सीटीस्कॅन, एमआरआय उपचारासाठी किती रुग्ण प्रतीक्षा यादीवर आहे, एकावेळी किती रुग्णांना घेतले जाते याची माहिती भाजपचे नगरसेवक दिलीप पटेल यांनी प्रशासनाक़डे मागितली. ही माहिती येत्या सभेत प्रशासनाने द्यावी असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages