नवीन उपाययोजनांमुळे नाना चौकातील पर्जन्य जल निचरा जलदगतीने शक्य - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नवीन उपाययोजनांमुळे नाना चौकातील पर्जन्य जल निचरा जलदगतीने शक्य

Share This
मुंबई / प्रतिनिधी - ‘डी’ विभागातील नाना चौक हा पावसाळ्यातील संभाव्य पर्जन्य जल संचय ठिकाणांमध्ये समाविष्ट आहे. मुंबई शहर विभागातील या अत्यंत वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या ठिकाणी पावसाळी पाण्याचा निचरा जलद गतीने करणे यंदा शक्य झाले असून त्याकरीता नवीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. परिणामी, नाना चौकातील संभाव्य पर्जन्य जल संचय परिस्थिती आता तासावरुन मिनिटावर आणण्यात महापालिका प्रशासनास यश आले आहे. 
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाच्या ताडदेव रस्त्याकडील प्रवेशद्वाराजवळ दोन नवीन पार्श्वनलिका व पर्जन्य जलमुखे बांधण्यात आली असून ती मुख्य पर्जन्य जलवाहिनीला जोडण्यात आली आहेत. तसेच ताडदेव सर्कल येथे नाना चौकाकडून येणारी व हाजी अलीकडे जाणारी पर्जन्य जलवाहिनी १८०० मि.मी. व्यासाच्या नलिकेने साने गुरुजी मार्गावरील पर्जन्य जलवाहिनीशी जोडल्यामुळे नाना चौक येथून पर्जन्य जलवाहिनीच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेमध्ये वाढ झाली आहे.

हाजी अली व लव्हग्रोव्ह उदंचन केंद्र येथील पर्जन्य जलवाहिनी उदंचन केंद्राचे पंप चालविण्याचे व्यवस्थापन लक्षात घेऊन, नाल्यातील पाणीपातळीच्या दर ताशी निरीक्षणाऐवजी दर पंधरा मिनिटांचे निरीक्षण करण्यात आले. प्रत्यक्ष पूरग्रस्त ठिकाणावरील निरीक्षणाची त्याला जोड देऊन नवीन पद्धती विकसित करण्यात आली आणि ही नवीन पद्धत अंमलात आणण्यात आली आहे.

या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आल्याने ‘डी’ विभागातील नाना चौक येथील पावसाळी पाण्याचा निचरा लवकर करणे शक्य झाले आहे. एकंदर संभाव्य पर्जन्य जल संचय परिस्थिती आता तासावरुन मिनिटावर आणण्यात महापालिका प्रशासनास यश आले आहे. दुय्यम अभियंता (पर्जन्य जलवाहिन्या) राजेंद्र जगताप यांनी या उपाययोजनांकरीता विविध खात्यांशी समन्वय साधून ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही जलदगतीने पूर्ण केली. या उपाययोजनांबद्दल स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages