मुंबईकरांच्या बहुविविध समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत चाललेली आहे. आपणास कोणीच वाली नाही काय ? असेही विचार त्यांच्या मनात येऊ लागले आहेत. याकडे गांभिर्याने लक्ष देऊन या समस्यांवर मात करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील ? यावर बृहन्मुंबई महानगरपालिका विरोधी पक्ष नेते प्रविण छेडा यांनी मुंबईतील ६ जिल्ह्यात रस्ता, पाणी, आरोग्य, मोकळी जागा, धोकादायक इमारती व घनकचरा अयोग्य व्यवस्थापन, शिक्षण अशा विविध समस्यांवर खुल्या चर्चा सत्राचे आयोजन केले आहे.
सदर चर्चा सत्रात मनपा अधिकारी, प्रजा फाउंडेशन, ऑब्जर्वर रीसर्च फाउंडेशन (ORF), फ्री ए बिलीयन (Free A Billion) चे प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिली.
मुंबईकर रस्त्यांच्या समस्येने अत्यंत बेजार झालेले आहेत त्यामुळेच पहिले खुले चर्चासत्र "मुंबईतील रस्ते" या विषयाने सुरुवात होणार आहे. येत्या रविवारी १३ नोव्हेंबर २०१६ रोजी सकाळी ११ वाजता मधुरंम पार्टी हॉल, गोखले शाळेच्या पुढे, शिंपोली, बोरिवली पश्चिम, मुंबई येथे होणार आहे. या खुल्या चर्चासत्राला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, संजय दराडे, अभियंता, मनपा, प्रजा फाउंडेशनचे नितल मेहता, सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगले, फ्री अ बिलियनचे कुमार आनंद आणि मनपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा हे उपस्थित राहून आपले विचार मांडणार आहे.
मुंबईतील विविध समस्या व उपाय या विषयांवर प्रत्येक रविवारी मुंबईतील विविध विभागात खुले चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या खुल्या चर्चासत्राला सर्व सामान्य नागरिकांनी भरघोस प्रतिसाद देऊन उपस्थित राहावे, असे मी आवाहन करतो तसेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महीन्यात मुंबईतील ६ जिल्ह्यातील विविध ठिकाणी ९० जाहिर सभा होणार आहेत, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.