कर्करोगाच्या जाणीव जागृतीसाठी विद्यार्थ्यांना पुस्तिकेच्या माध्यमातून शिक्षण - डॉ.जे.पी.नड्डा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 November 2016

कर्करोगाच्या जाणीव जागृतीसाठी विद्यार्थ्यांना पुस्तिकेच्या माध्यमातून शिक्षण - डॉ.जे.पी.नड्डा

मुंबई दि. 4 : तंबाखू आणि तंबाखूजन्य वस्तूंच्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांमध्ये मौखिक कर्करोगाविषयी जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे 25 डिसेंबरपासून पुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कर्करोगाच्या दुष्परिणामाविषयी शिक्षण दिले जाणार आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.जे.पी.नड्डा यांनी आज येथे जाहीर केले.
मौखिक आरोग्य निगा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सुश्रुत पुरस्कार देऊन इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे गौरव करण्यात आला. येथील हॉटेल स्टार सहारामध्ये हा सोहळा झाला. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत, आयडीएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अलियास थॉमस,आयडीएचे अध्यक्ष डॉ.टी.एन.तिलकराज, संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष (निर्वाचित) डॉ.विश्वास पुराणिक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

नाविन्यपूर्ण प्रतिबंधात्मक धोरणे आखून मौखिक आरोग्यातील शहरी व ग्रामीण दरी भरून काढली जाणे गरजेचे आहे. त्याचबरोबर या घटकांना किफायतशीर मौखिक आरोग्य निगा मिळणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. मौखिक आरोग्याच्या बाबतीत अधिकाधिक जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रकल्प आणि उपक्रम राबविण्याची गरज आहे. ग्रामीण भागात दंतसेवा प्रभावीपणे पुरविण्यासाठी सेवाभावी संस्थांचे सहकार्य आवश्यक आहे. गेल्या दीड दशकांमध्ये दंतशास्त्राने मोठी प्रगती साधली आहे. दंतशास्त्रातील सुधारित उपचार पद्धती नागरी क्षेत्रात उपलब्ध आहेत. त्या छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये घेऊन जाणे गरजेचे आहे. पुरस्कारार्थींनी केलेल्या लोकोपयोगी वृत्ती ग्रामीण भागात प्रगत सेवा पोहोचविण्यासाठी गरजेची आहे, असेही नड्डा म्हणाले.

डॉ.सावंत म्हणाले की, ग्रामीण भागात मौखिक आरोग्याबाबत जागृती करणे काळाची गरज आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मौखिक कर्करोगाचा प्रसार ही चिंताजनक बाब आहे. कर्करोगाचा प्रसार रोखण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. राज्य शासनातर्फे थुंक प्रतिबंधक कायदा तयार करण्यात येत असून असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असणार आहे. ग्रामीण भागात कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी आयडीएने दंतचिकित्सा शिबिरे आयोजित करावी असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.

यावेळी डॉ.विनय हजारे यांना त्यांनी मौखिक कर्करोग जागृतीच्या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल सुश्रुत पुरस्काराने गौरविण्यात आले. न्या.नारायण कुरुप यांना तंबाखू नियंत्रणात वैयक्तिक पातळीवर दिलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला. लाईफ लाईन एक्स्प्रेस या सेवाभावी संस्थेला संस्थात्मक पातळीवर मौखिक आरोग्य निगा क्षेत्रातील जागृतीमध्ये केलेल्या कामगिरीसाठी पुरस्कार देण्यात आला. तसेच कलिंगा दंत महाविद्यालय (संस्थात्मक विभाग), प्रिवेस्ट डेटप्रो लिमिटेड (दंत क्षेत्रातील उत्पादने), लेफ्टनंट जनरल टी. के. बंदोपाध्याय (लष्करी सेवा विभाग), अंकिता चंद्र व डॉ.प्रमोद पटनी (मौखिक आरोग्यनिगा सेवा), डॉ.आर.के.बाली आणि डॉ.आर.बेली (भारतीय दंतशास्त्र क्षेत्र), पेट्रीट हेस्कॉट (आंतराष्ट्रीय स्तर), डॉ.सबिता राम (एम्पॉवर्ड विमेन डेन्टिस्ट ऑफ द इयर), डॉ.गेहानी (दंतशास्त्रातील अतुलनीय योगदान), डॉ.दिनेश दफ्तरी (दंतशास्त्र संशोधन), डॉ.म्हैसकर (आंतराष्ट्रीय स्तर) आदींनाही पुरस्काराने गौरविण्यात आले.

Post Bottom Ad