काळा पैसा बाहेर काढण्याचे भाजपचे दावे हे निव्वळ वल्गना असून असे दावे करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच पक्षाचे मंत्री काळ्या पैशाच्या कारवाईत सापडल्याने भाजपचे ढोंग उघडे पडल्याचा टोला समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आ. अबु आझमी यांनी लगावला आहे. काळा पैसा बाळगणाऱ्यांना सोडणार नाही, असे वक्तव्य मध्यंतरी पंतप्रधानांनी केले होते. मग आता राज्याच्या सहकार मंत्र्याच्या मालकीच्या बँकेच्या गाडीतच एक कोटीची रक्कम पोलीसांनी जप्त केल्यानंतरही पंतप्रधान गप्प का, असा सवालही त्यांनी केला आहे.
केंद्र सरकारने हजार आणि पाचशेच्या नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर काळा पैसा बाळगणाऱ्यांचे धाबे दणाणले असून त्यांची काळा पैसा पांढरा करण्याची धडपड चालली आहे. असाच काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न भाजपचे नेते आणि महाराष्ट्राचे सहकार मंत्री असलेल्या सुभाष देशमुख यांनी केल्याचा आरोप करत मा. अाझमी म्हणाले की, पोलीसांनी १६ नोव्हेंबरला देशमुख यांच्या लोकमंगल या संस्थेच्या गाडीतून ९१ लाख ५० हजारांची बेहिशोबी रोकड जप्त केली आहे. या पैशाबद्दल अजूनही कोणतेही समाधानकारक उत्तर सहकार मंत्र्यांना देता आलेले नाही. त्यामुळे त्यांची तात्काळ राज्याच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मा. आझमी यांनी केली आहे. या घटनेमुळे भाजपचा ढोंगी चेहरा सर्वांसमोर आल्याचेही ते म्हणाले.
यापुर्वीही राजस्थानच्या अलवर येथे २०१४ साली एका जाहीर कार्यक्रमात भाजपचे लोकसभेचे उमेदवार महंत चांदनाथ आणि बाबा रामदेव हे काळ्या पैशाबद्दल बोलताना कॅमेरात कैद झाले होते. यावरून भाजपचेच नेते या काळ्या पैशांच्या व्यवहारात आकंठ बुडाल्याचे सिद्ध होत असल्याचा टोलाही मा. आझमी यांनी हाणला. नोटाबंदीच्या निर्णयामुळे ज्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय, त्यांना पंतप्रधान म्हणतात थोडी कळ सोसा. पण आपल्या नेत्यांची काळी कृत्ये मात्र पंतप्रधान दुर्लक्षित करतात, असे सांगत मा. आझमी म्हणाले की, पंतप्रधानांनी काळा पैसा बाळगणाऱ्यांवर जरूर कारवाई करावी, मात्र आपल्याच पक्षाच्या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई करण्याची ते हिंमत दाखवणार का, असा सवालही त्यांनी पंतप्रधान मोदींना केला आहे.