माध्यमांनी ‘गो डिजीटल’ हा मूलमंत्र स्वीकारण्याची गरज - शेखर पाटील - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

माध्यमांनी ‘गो डिजीटल’ हा मूलमंत्र स्वीकारण्याची गरज - शेखर पाटील

Share This
मुंबई, दि. 16 Nov 2016 : आधुनिक व सतत अद्ययावत होत जाणा-या तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात टिकून राहण्यासाठी हे तंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय माध्यमांना तरणोपाय नाही. माहिती व अभिव्यक्ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी माध्यमे व त्यात काम करणा-या व्यक्तींनी ‘गो डिजीटल’ हा मूलमंत्र अंगीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन दै. जनशक्ती, तसेच ‘टेक वार्ता’चे संपादक शेखर पाटील यांनी आज येथे केले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त‘नव्या माध्यमांची आव्हाने’ या विषयावर पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (वृत्त व जनसंपर्क) देवेंद्र भुजबळ, संचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकर, विधानसभा अध्यक्षांचे विशेष कार्यकारी अधिकारी नीलेश मदाने यांच्यासह अनेक पत्रकार, विविध शासकीय, निमशासकीय संस्थांचे जनसंपर्क अधिकारी, तसेच महासंचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

तंत्रज्ञानामुळे सतत अद्ययावत होत जाणा-या विविध माध्यमांच्या संकरातूनच मुद्रित व इतर पारंपरिक माध्यमे अधिक समृद्ध होत जातील. याविषयी मुद्रित माध्यमांचे व्यवस्थापन आणि पत्रकार या दोन्ही घटकांना सज्ज व्हावे लागेल, असे सांगून पाटील म्हणाले की, सोशल मीडियासह अनेक प्रकारची तंत्रज्ञानावर आधारलेल्या माध्यमांचा अंगीकार करणे हे सहजसुलभ आहे. मात्र, त्याचा स्वीकार केला पाहिजे. घटनेचे प्रत्यक्षदर्शी चित्रण ही या माध्यमांची ताकद असून, ती पारंपरिक माध्यमांनाही संदेशवहनासाठी अधिक प्रभावी मार्ग ठरेल. हायब्रीड मीडिया ही काळाची गरज असून, स्मार्टफोनसारखे वैयक्तिक साधनही माहितीवहनासाठी उपयुक्त ठरत आहे. प्रिंट आणि डिजिटल माध्यमांचा समन्वय साधण्यासाठी हा स्मार्टफोन सेतूचे काम करेल, असेही ते म्हणाले.

आपल्या वृत्तपत्रात क्यू आर कोडचा वापर उपयुक्त ठरल्याचे सांगून पाटील म्हणाले की, क्युआर कोडसारखी (क्वीक रिस्पॉन्स कोड) साधने सहज उपलब्ध आहेत. त्याचा उपयोग सर्वत्र झाला पाहिजे. मजकूर आणि जाहिरातींना साज चढविण्यासाठीही याचा वापर करता येऊ शकतो. यासोबतच लाईव्ह स्ट्रिमिंग, चॅटबॉटसारखी साधनेही माध्यमांना उपयुक्त ठरत आहेत. तंत्रज्ञान जितके प्रगत तितके ते वापरण्यासाठी सोपे असते. दिवसेंदिवस तंत्रज्ञान अद्ययावत होत असून त्यानुरूप वापर करणा-यांनीही स्वत:ला लवचिक ठेवणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले.

खोटी माहिती प्रसृत होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे माहितीची सत्यासत्यता पडताळूनच ती प्रसिद्ध केली पाहिजे, असेही पाटील म्हणाले. संचालक (माध्यम समन्वयक) मानकर यांनी केले. उपसंचालक (प्रकाशने) सुरेश वांदिले यांनी आभार मानले. उपसंपादक संध्या गरवारे यांनी सूत्रसंचालन केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages