कल्याणजवळ अंबरनाथ लोकलचे 5 डबे घसरले - रेल्वेची वाहतूक कोलमडली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कल्याणजवळ अंबरनाथ लोकलचे 5 डबे घसरले - रेल्वेची वाहतूक कोलमडली

Share This
मुंबई 29 Dec 2016 - कल्याण विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान लोकलचे पाच डबे रुळावरुन घसरल्यामुळे मध्य रेल्वेची कल्याण ते अंबरनाथपर्यंत वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
कुर्ला-अंबरनाथ लोकलने कल्याण स्थानक सोडल्यानंतर ट्रॅक बदलत असताना लोकलचे डबे रुळावरुन घसरले. डबे हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या अपघातात ट्रॅकचे, वीजेच्या खांबाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाहतूक पूर्ववत होण्यास काही तास लागू शकतात. अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसह लांब पल्ल्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळी ऐन कामावर जायच्यावेळी हा अपघात झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. कल्याण-कर्जत मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. कल्याणच्या पुढच्या प्रवाशांचे हाल होणार आहेत तसेच पुणे आणि अन्य ठिकाणांहून येणा-या लांब पल्ल्यांच्या गाडयांचे वेळापत्रकही कोलमडले आहे. 

अपघातामुळे मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला असून रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा यंत्रणेची कुमक मागवली आहे. प्रवाशांचा त्रास कमी व्हावा यासाठी अंबरनाथ-कर्जत दरम्यान शटल सेवाही सुरू करण्यात आली आहे. मध्य रेल्वेने कल्याण-डोंबिवली महापालिकेला कल्याण-अंबरनाथ दरम्यान जास्त बसेस चालवण्याची विनंती केली आहे. ऐन सकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages