वानखेडे स्टेडियमवर जास्त दराने पाणी बाटली विकणाऱ्यांविरुद्ध कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 December 2016

वानखेडे स्टेडियमवर जास्त दराने पाणी बाटली विकणाऱ्यांविरुद्ध कारवाई


मुंबई, दि. 14 Dec 2016 :
मुंबईत वानखेडे स्टेडियमवर भारत व इंग्लंड यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यावेळी स्टेडियममध्ये छापील किमतीपेक्षा (एमआरपी) जास्त दराने पाण्याची बाटली विकणाऱ्यांवर वैध मापन शास्त्र यंत्रणेने खटला दाखल केला आहे. तसेच छापील किमतीपेक्षा जास्त दराने कोणत्याही पॅकबंद वस्तूंची विक्री करू नये,अशा सूचना विक्रेत्यांना देण्याचे निर्देश वैध मापन शास्त्र यंत्रणेने भारतीय नियामक मंडळ व मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिले आहे, अशी माहिती वैध मापन शास्त्र नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

वानखेडे स्टेडियम येथे छापील किंमतीपेक्षा जास्त दराने पॅकबंद वस्तूंची विक्री होत असल्याची तक्रार वैध मापन शास्त्र यंत्रणेकडे आली होती. या तक्रारीसंदर्भात तपासणी करण्याचे आदेश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या तपासणीमध्ये मे.व्हिल्स आणि मोअर (गाळा क्र.7, तळमजला, वानखेडे स्टेडियम) या विक्रेत्यांने एक लिटर पाण्याच्या बाटलीची किंमत 20 रुपये असताना ती 50 रुपयास विक्री केल्याचे आढळले. आवेष्टित वस्तू नियमानुसार छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे म्हणजे ग्राहकांची फसवणूक आहे. त्यामुळे या विक्रेत्यांविरुद्ध वैध मापन शास्त्र अधिनियम 2009तील तरतुदीनुसार खटला दाखल करण्यात आला आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

आवेष्टित वस्तूंची विक्री छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे ही ग्राहकांची फसवणूक असून असे प्रकार टाळण्यासाठी विक्रेत्यांना योग्य त्या सूचना देण्याचे व विक्रेत्यांसोबत करारनामा करताना वैधमापन शास्त्र अधिनियम व अंतर्गत नियमांचे पालन करण्याच्या स्पष्ट सूचना त्यामध्ये करण्याचे आदेश वैध मापन शास्त्र यंत्रणेने भारतीय क्रिकेट मंडळ व मुंबई क्रिकेट असोसिएशन यांना दिले आहे.

ग्राहकांनी फसवणूक टाळण्यासाठी वस्तू खरेदी करताना जागरुक रहावे. तसेच यासंबंधी काही तक्रारी असल्यास वैध मापन यंत्रणेच्या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक (022-22886666) किंवा dclmms@yahoo.in किंवा dclmms_complaints@yahoo.com,dyclmmumbai@yahoo.in, dyclmkokan@yahoo.indyclmnashik@yahoo.com, dyclmpune@yahoo.in, dyclmaurangabad@yahoo.in, dyclmamravati@yahoo.in, dyclmnagpur@yahoo.in या ई-मेल पत्त्यावर तक्रारी नोंदविण्यात याव्यात, असे आवाहन गुप्ता यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Post Bottom Ad