मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटबंदीची घोषणा केली, त्याला आता एक महिना उलटून गेला. बँकेत पुरेश्या नवीन नोटा नाहीत. रोज बँकेत जुन्या नोटा भरण्याकरता आणि पैसे काढण्याकरिता लांबच-लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. या नोटबंदीमुळे सामान्य व गरीब जनतेचे अतोनात हाल होत आहेत. या रांगांमुळे आतापर्यंत १०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या अन्यायपूर्ण नोटबंदीच्या विरोधात जनजागरण करण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे संपूर्ण मुंबईतील ६२ रेल्वे स्थानकांवर उद्या दि. १५ डिसेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत स्वाक्षरी अभियान करण्यात येणार आहे. मुंबई काँग्रेसतर्फे लोकांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी या स्वाक्षरी अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की बँकांमध्ये नोटबंदी सुरु झाल्यापासून बँकांमध्ये लोक मोठ्या प्रमाणात कॅश डिपॉझिट करत आहेत. देशातील सर्व बँकांमध्ये होणाऱ्या कॅश डिपॉझिटमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणल्यामुळे लोकांना मजबुरीने आपल्या जवळील कॅश बँकेत डिपॉझिट करावी लागत आहे आणि आता असे चित्र आहे की सर्व बँकांनी डिपॉझिट वरील व्याज दर मध्ये कपात केली आहे. हा अतिशय गंभीर विषय आहे. या कपातीमुळे ज्यांनी फिक्स्ड डिपॉझिट ठेवले आहेत किंवा जे पेंशनर आहेत, अशा सामान्य माणसाला मिळणाऱ्या व्याजावर गदा आली आहे. त्यासाठी आम्ही अर्थमंत्री अरुण जेटली यांना मुंबई काँग्रेसतर्फे पत्र पाठवून कळवलेले आहे की त्यांनी आरबीआयला सूचना द्याव्यात की सर्व बँकांनी डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याज दरामध्ये कपात करू नये. व्याज दर कपातीमुळे सामान्य व गरीब जनतेचे प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे.
संजय निरुपम पुढे म्हणाले की येत्या २४ तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यासाठी मुंबईत येणार आहेत. हे भूमिपूजन म्हणजे फक्त मराठ्यांची दिशाभूल आहे. निवडणुका आल्या की भाजपाला महान पुरुषांच्या स्मारकांची आठवण येते. मागच्या वर्षी २०१५ मध्ये बिहार निवडणुकापूर्वी इंदु मिलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन आणि आता शिवस्मारकाचे भूमीपूजन हे फक्त निवडणुकीपूर्वी लोकांना आकर्षित करण्याचा डाव आहे, असा आमचा आरोप आहे. मराठा समाजाने भाजपाची हि खेळी समजली पाहिजे. मराठा आरक्षणाला व शिवस्मारकाला कॉंग्रेसचा संपूर्ण पाठिंबा आहे. आमची इच्छा आहे की या दोन्ही गोष्टी लवकरात लवकर झाल्या पाहिजेत.