'एम पूर्व' विभागात लहान मुलांसाठी स्वतंत्र शौचालय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

'एम पूर्व' विभागात लहान मुलांसाठी स्वतंत्र शौचालय

Share This
मुंबई 2 Dec 2016 - बृहन्मुंबई महापालिका क्षेत्र हागणदारी मुक्त व्हावे यासाठी महापालिका सर्व स्तरावर प्रयत्न करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून 'एम पूर्व'विभाग परिसरामध्ये १२ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील लहान मुलांसाठी स्वतंत्र शौचालये बसविण्यात येत आहेत. विशेष म्हणजे ही सर्व शौचालये निशुल्क असणार असून शौचालयांचे परिरक्षण व देखभाल महापालिकेद्वारेच करण्यात येणार आहे, अशी माहिती 'एम पूर्व'विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे. 
याबाबत अधिक माहिती देतांना किलजे यांनी सांगितले की, एम पूर्व विभागात अनेक ठिकाणी सशुल्क सार्वजनिक शौचालये आहेत. या शौचालयांचा वापर परिसरातील नागरिकांनी नियमितपणे करावा यासाठी महापालिकेद्वारे विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले, जनजागृती मोहिमा देखील राबविण्यात आल्या. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. मात्र, लहान मुलांना सशुल्क शौचालयात पाठविण्याबाबत नागरिकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे या भागातील मुले मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचास जात होती. ही बाब लक्षात आल्यानंतर विभाग परिसराचे सर्वेक्षण करण्यात येऊन ६ ठिकाणी लहान मुलांसाठी निशुल्क शौचालय बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयानुसार 'प्री - कास्ट' पद्धतीचे सिमेंटचे शौचालय घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड व देवनार क्षेपणभूमीच्या ऍप्रोच रोडच्या जंक्शनवर बसविण्यात आले आहे. तर उर्वरित ५ ठिकाणी देखील लवकरच लहान मुलांसाठीची शौचालये बसविण्यात येणार आहेत. या ५ ठिकाणांमध्ये देवनार क्षेपणभूमीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील परिसर, जाकीर हुसेन नगर, रफिक नगर यासारख्या परिसरांचा समावेश आहे, अशीही माहिती किलजे यांनी दिली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages