मुंबई - ग्रामीण भागातील अनुसुचित जाती व नवबौध्दांना हक्काचे घर मिळावे यासाठी रमाई आवास योजना तसेच अनुसूचित जमातीतील कुटुंबांसाठी शबरी आवास योजनेंतर्गत घरे बांधन्यात येतात. यासाठी देण्यात येणारे अनुदान साधारण क्षेत्रासाठी 1 लाख 32 हजार रुपये व नक्षलग्रस्त व डोंगराळ भागासाठी 1 लाख 42 हजार रुपये प्रति घरकूल देण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.
ही घरकुले बांधताना त्यासोबतच शौचालयाच्या बांधकामासाठी या लाभार्थ्यांना 12 हजार रुपये एवढी प्रतिपूर्ती पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेमधील लाभार्थ्यांना मनरेगा अभियानांतर्गत देण्यात येत असलेले अनुदान रमाई आवास योजना व शबरी आवास योजना यांनाही लागू असेल. या अनुदानांतर्गत साधारण क्षेत्रातील कुटुबांना रुपये 17 हजार 280 तर नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी रुपये 18 हजार 240 एवढे अनुदान उपलब्ध करुन देण्यात येईल.
शहरी भागात राबविण्यात येणार्या रमाई आवास व शबरी आवास योजनेसाठी लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न रुपये 3 लाख पर्यंत असावे. घरकुल बांधकामासाठी अडीच लाख रुपये एवढे अनुदान देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याने प्रधानमंत्री आवास योजनेतील ग्रामीण भागातील लाभार्थी व रमाई आवास योजनेतील लाभार्थी यांच्यातील अनुदानात तफावत राहणार नाही.