कामच मिळत नसल्याने अनेकांपुढे जगण्याचा प्रश्न
मुंबई (प्रतिनिधी)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा फटका मुंबईतील बांधकाम क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाºया रंग कामगारांना बसला आहे. अनेक कामगारांना मागील दीड महिन्यात एकदाही हाताला काम लागले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. तर अनेकांनी मुंबईत असलेल्या अनेक रंग कामगार नाक्यांवर मोठ्या प्रमाणात शुकशुकाट पसरला असल्याचे बंजारा नाका कामगार संघटनेकडून सुरू करण्यात आलेल्या राज्यव्यापी जनजागृती अभियानादरम्यान दिसून आले आहे.
मुंबईत मागील अनेक दशकांपासून कुर्ला, भायखळा, बोरा बाजार, कांदिवली आणि नवी मुंबईतील कोपरखैरणे, ऐरोली, वाशी आदी ठिकाणी २५ हून अधिक नाके हे रंगकामगारांचे नाके म्हणून प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी सुमोर १ लाख २५ हजारांहून अधिक रंगकामगार कार्यरत आहेत. प्रत्येक दिवशी सकाळी ७ ते साडे नऊच्या सुमारास इमारतीसाठी रंग कामासाठीचे विविध प्रकारचे काम मिळेल यासाठी उभे असतात. मात्र मागील काही दिवसांमध्ये नोटाबंदीच्या निर्णयाने या कामगारांना कामच मिळणे कठिण झाले असून जे काम नियमित असाचे तिथे आता आठ दिवसांतून एकदाही मिळेल याची शाश्वती उरली नसल्याने कुटुंब चालविणे कठिण असल्याचे कुर्ला येथील रंग कामगार नाक्यावर मागील ३४ वर्षांपासून नियमित असणारे ज्ञानेश्वर कदम यांनी सांगितले. तर नाका कामगारांचीही मुंबईत आणि राज्यात खूप वाईट स्थिती असल्याचे बंजारा नाका कामगार संघटनेचे प्रमुख अॅड. नरेश राठोड यांनी सांगितले.
कुर्ल्यातील रंगकामगार नाका हा स्टेशनला चिकटून असल्याने इथे मुंबईतून अनेक इमारत मालक, कंत्राटदार इथे येऊन आपल्याला काम देतात, त्यामुळे आपण रोज इथे धारावीहून येतो. मात्र मागील दीड महिन्यात कामच बंद झाल्याने अत्यंत वाईट परिस्थितीला आम्हाला सामोरे जावे लागत असल्याचे शिवाजी भाळे यांनी सांगितले. तर उत्तर प्रदेशातून येऊन इथे स्थायिक झाल्यापासून आपल्याला कधीही असे दिवस पहायला मिळाले नसल्याची प्रतिक्रिया रंग कामगार दिलिपकुमार गुप्ता यांनी दिली. तर मागील २५ वर्षांपासून केवळ रंग काम करणारे पांडू दुबळ यांनीही आपले नोटाबंदीमुळे कुटुंब उपासमारीवर येऊन ठेपले असल्याचे सांगितले.
No comments:
Post a Comment