चेंबूर स्टेशन मनपा उर्दू स्कूल कबड्डी संघाने अजिंक्यपद पटकावले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चेंबूर स्टेशन मनपा उर्दू स्कूल कबड्डी संघाने अजिंक्यपद पटकावले

Share This
मुंबई : अंतिम सांघिक क्रीडा स्पर्धेमधील मुंबई विभागीय आंतर मनपा शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत चेंबूर स्टेशन मनपा उर्दू स्कूल कबड्डी संघाने अजिंक्यपद पटकावले. अंतिम फेरीत चेंबूर स्टेशन मनपा उर्दू स्कूलने कुरार व्हिलेज-मालाड मनपा हिंदी स्कूलचा ३३-२१ असा पराभव केला. विजेत्यांच्या यशात कप्तान तैयाब्बा अक्रम व रेशमा शेख यांच्या चढाई खेळाची प्रमुख कामगिरी होती. अंतिम फेरी सामन्याप्रसंगी शिक्षण समितीचे अध्यक्ष हेमांगी वरळीकर, मुंबई शहर क्रीडा अधिकारी व राष्ट्रीय कबड्डीपटू सुवर्णा बारटक्के, क्रीडा शिक्षक डॉ. जितेंद्र लिंबकर आदी मंडळी उपस्थित होती.

मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग - उपविभाग शारीरिक शिक्षण तर्फे अंतिम सांघिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. धारावी येथील राजीव गांधी क्रीडा संकुलामध्ये अंतिम सांघिक क्रीडा स्पर्धेत मुंबईमधील १७ विभाग सहभागी झाले होते. मुलींच्या कबड्डी विभागात चेंबूर स्टेशन मनपा उर्दू स्कूल विरुद्ध कुरार व्हिलेज-मालाड मनपा हिंदी स्कूल यामधील अंतिम लढत पूर्वार्धात चुरशीची झाली. कुरार व्हिलेज-मालाड मनपा हिंदी स्कूलच्या खेळाडूंनी सांघिक खेळाच्या बळावर मध्यंतराला १३-१२ अशी आघाडी घेतली होती. परंतु उत्तरार्धात कप्तान तैयाब्बा अक्रम व रेशमा शेख यांच्या चढाया आणि यास्मिन शेख व निकद मसुरी यांच्या पकडी खेळातील अप्रतिम कामगिरीमुळे अंतिम सामना चेंबूर स्टेशन मनपा उर्दू स्कूल कबड्डी संघाच्या बाजूने १२ गुणांच्या फरकाने झुकला. अंतिम विजेत्या चेंबूर स्टेशन मनपा उर्दू स्कूल कबड्डी संघाला मुख्याध्यापिका कुरेशी, प्रशिक्षक संजय कांबळी व क्रीडा शिक्षक रमेश बोडके यांचे नियमित मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभत होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages