लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दलित-मुस्लिम-ब्राह्मण असे सोशल इंजिनिअरिंगचे समिकरण आखलेल्या बहुजन समाज पक्षाने गुरुवारी १00 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात प्रामुख्याने ३६ मुस्लिम उमेदवारांना तिकीट देण्यात आले. मुलिम समाज हा समाजवादी पक्षाचा पारंपरिक मतदार म्हणून ओळखला जातो.
यंदाच्या निवडणुकीत त्यांना आपल्याकडे खेचण्याचा बसपद्वारे जोरदार प्रयत्न होत आहे. राज्यात मुस्लिम लोकसंख्या २0 टक्के आहे. त्या अनुषंगाने उमेदवारी देण्याची भूमिका बसप सुप्रीमो मायावतींनी घेतली. पहिल्या टप्प्यात त्यांनी ३६ मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरविलेत. उर्वरित जागांवरील उमेदवार लवकरच घोषित होतील. बसपने एकूण ४0३ उमेदवार निश्चीत केलेत. त्यात दलित ८७, मुस्लीम ९७, ओबीसी १0६, सवर्ण ११३ असे प्रतिनिधीत्व देण्यात आले. सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हे ब्रिदवाक्य केंद्रस्थानी ठेऊन जागावाटप केल्याचे मायावतींनी सांगितले. साधारणत: मुस्लिम लोक समाजवादी पक्षाला मत देतात. परंतू यंदा सपमध्ये कौटूंबिक घमासान माजले असल्याने मुस्लीम लोक द्विधा मन:स्थितीत आहेत. नेमकी हीच संधी साधत या समुदायाला बसपत नेतृत्वाची संधी देऊन राज्याची सत्ता बळकावण्याचा मायावतींचा हेतू आहे.